भुसावळ। तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायत हद्दीतील गोलाणी कॉम्प्लेक्स परिसराला टंचाईचे चटके जाणवत असल्याने सोमवारपासून प्रशासनातर्फे एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सुमारे 1200 नागरिकांची लोकवस्ती असलेल्या गोलाणी कॉम्प्लेक्समध्ये नागरिकांना धड पिण्यासाठीदेखील पाणी नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत होते. यासंदर्भात या भागातील नागरिकांनी तहसील प्रशासनाकडे लेखी तक्रार केल्यानंतर शनिवार, 12 रोजी दुपारी 1.30 वाजता प्रभारी तहसीलदार संजय तायडे, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे शाखा अभियंता एस.पी.लोखंडे, टंचाई शाखेचे लिपीक अमरदीप मुनेश्वर यांनी या भागाची पाहणी करत नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता या भागातील नागरिकांसाठी सोमवारपासून एका टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन प्रसंगी देण्यात आले. दरम्यान, शिंदी येथेदेखील पाणीटंचाई निवारणार्थ विंधन विहिर अधिग्रहिणाचे आश्वासन देण्यात आले.
पावसाची ओढ; ट्युबवेल आटल्या
गेल्या दीड महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून आभाळमाया रुसल्याने सर्वत्र चिंतेचे सावट पसरले आहे. त्यातच गोलाणी कॉम्प्लेक्स परिसरातील विहिरी व ट्युबवेल यांनी तळ गाठल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. यापूर्वी येथे प्रशासनातर्फे एका टँकरने पाणीपुरवठा केला जात होता मात्र जूनच्या प्रारंभी दमदार पाऊस झाल्याने प्रशासनाने टँकर बंद केला. परिणामी नागरिकांची पाण्यासाठी पुन्हा भटकंती सुरू झाली आहे.
गोलाणी कॉम्प्लेक्स परिसरातील नागरिकांच्या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली असून सोमवारपासून या भागात एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल.
संजय तायडे, प्रभारी तहसीलदार, भुसावळ