जळगाव । गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल दुकानदारांनी फ्लेक्स, जाहीराती लावून अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणांवर कोणतीच कारवाई का करण्यात आली नाही याची विचारणा दै. जनशक्तीच्या प्रतिनीधीने आयुक्त जीवन सोनवणे यांना मोबाईलद्वारे केली. यानंतर आयुक्त सोनवणे यांनी अतिक्रमण विभागाला तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. यानुसार अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान यांनी आपल्या पथकासह गोलाणी मार्केट गाठले. या कारवाईत विविध मोबाईल दुकांनदारांनी मोठ मोठ्या जाहीराती आपल्या दुकांनासामोरच लावल्याचे पथकास आढळून आले.
गोलाणी मार्केटमध्ये गोंधळ निर्माण झाल्याची माहिती शहर पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अचानक कारवाई करण्यात आल्याने बघ्यांनी तेथे गर्दी केली होती.
दुकानदारांमध्ये गोंधळ
दुकानदारांनी बॅनर, फलक लावल्याने मार्केटमध्ये येणार्या नागरिकांना चालणे देखील मुश्कील झाले होते. गोलाणी मार्केटमध्ये अचानक करण्यात आलेल्या अतिक्रमण काढण्याच्या कारवाईने दुकानदारांमध्ये गोंधळ उडाला. अतिक्रमण निर्मुलन पथकाने 60 ते 70 बोर्ड जप्त केले. गोलाणी मार्केटच्या ग्राउंड फ्लोवर व फस्ट फ्लोवरील फलक, बोर्ड तसेच दुकानाच्या बाहेर लावण्यात आलेले फर्निचर जप्त करण्यात आले.