गोलीणी मार्केटमधील मिटर रुमला आग

0

जळगाव। शहरातच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गोलाणी व्यापारी संकूलनातील ई-विंगमधील तीन मिटर रूमला शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराळा झाल्यामुळे व्यापार्‍यांची पळापळ सुरू झाली होती. अखेर अग्निशमन दलाची वाट न पाहताच व्यापार्‍यांनी लाईट बंद करून पाण्याचा मारा करत आग विझवली. ही घटना मंगळवारी सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, मिटररुमला लागलेल्या आगीमुळे गोलाणीची बत्तीगुल झाली होती.

शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज
गोलाणी व्यापारी संकुलनातील ई-विंगमधील दुसर्‍या मजल्यावरील मिटररूमध्ये मंगळवारी सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास शॉर्टसर्कीट होवून अचानक आग लागली. या मिटरुमला आग लागल्याने लागलीच पहिल्या मजल्यावरील व तळमजल्यावरील मिटररुममध्येही शॉर्टसर्कीट होवून चांगलीच आग लागली. त्यातच विजपुरवठा सुरू असतांनाच तिघाही मिटर रूमला आग लागलयाने वायरींग जळू लागल्या आणि विद्यत पुरवठा करणार्‍या तारा देखील उघड्या पळल्या. त्यानंतर गोलाणीतील व्यापार्‍यांनीच आग वाढू नये यासाठी विद्युत पुरवठा खंडीत केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाला आगीची माहिती दिली.

आगीमुळे ई-विंगमध्ये पसरला धुर
ई-विंगमधील दुसर्‍या मजल्यावरील मिटर रुममध्ये शॉर्ट सर्कीट झाला मात्र, पहिल्या व तळमजल्यावरील मिटर रुमला मोठ्या प्रमाणात आग लागल्याने व्यापार्‍यांसह ग्राहकांची धावपळ सुरू झाली होती. मात्र वायरींग जळाल्याने धुराचे लोड बाहेर येत होते. त्यामुळे पुर्ण ई-विंगमध्ये धुर पसरले होते. आग लागल्यामुळे व्यापार्‍यांनीही आप-आपली दुकाने झटपट बंद केल्याचे दिसून आले. या धुरामुळे नागरिकांना त्रास होत होता.

बादल्यांनी पाणी टाकून आग विझविली
ई-विंगमधील पहिल्या व तळमजल्यावरील मिटर रूममध्ये आगीने चांगलाच भडका घेतल्याने व्यापार्‍यांची धावपळ उडाली. यानंतर अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर उशिर होत असल्याने व्यापार्‍यांनी तात्काळ बादल्यांनी मिटररुममध्ये पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले. आग विझविल्यानंतर अग्निशमन दलाचे गोलाणीत पाचारण करण्यात आले. यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी पुन्हा दोन्ही मिटर रुममध्ये पाण्याचा मारा केला.

दहा दिवसांपूर्वीही लागली मिटर रुमला आग
गोलाणी मार्केटमधील जी-18 विंगमध्ये गेल्या दहा दिवसांपूर्वी 13 मे रोजी अशाच प्रकारे तीन मिटर रुमला आग लागून संपूर्ण वायरी जळून खाक झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, गोलाणीत मिटर रुमला आग लागल्याची ही दोन ते तीन महिन्यातील चौथी घटना असून याबाबत व्यापार्‍यांनी तक्रारी करून देखील महानगरपालिकेतर्फे काहीही उपाय योजना करण्यात येत नसल्याने व्यापारी वर्ग संताप व्यक्त करीत आहेत. तर गोलाणीतील बहुतेक विद्युत मिटर रुमांना दरवाजा नसून यामध्ये कचर्‍याचे ढिगारे पडलेले असतात. यातुन देखील आग लागण्याच्या घटना घडत असतात.