मुंबई । पादचार्यांच्या मृत्यूमध्ये महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर असून, एकूण अपघातांपैकी 17.7% (7,088 पैकी 1,256) पादचार्यांचा मृत्यू राज्यात झाला आहे, तर दुचाकी अपघातात महाराष्ट्र तामीळनाडूपाठोपाठ दुसर्या क्रमांकावर होते. राज्यात अपघातांमध्ये 3,146 जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे महामार्गांवरील वाढत्या अपघातांचा आलेख रोखण्यासाठी सरकारने ‘गोल्डन अवर्स’ संकल्पना राबवण्यास प्रारंभ केला. यामुळे अपघातांच्या संख्येत कमालीची घट झाली. त्याचबरोबर लेन कटिंग, ओव्हरस्पीड यावरही महामार्ग पोलिसांकडून होणार्या दंडात्मक कारवाईत वाढ झाली. वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून पोलिसांनी सुट्ट्या आणि विकेंडच्या काळात राज्य महामार्गावर अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घातली.
2017 मध्ये राज्यात 11 हजार 171 अपघातांमध्ये 12 हजार 215 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांमधील बहुतांश अपघात हे चालकांच्या चुकीमुळे झाले आहेत. आकडेवारीनुसार 2009 ते 2016 या काळात राज्यात 1, 02, 219 प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला. त्यातील 88,125 (86.2%) अपघात मानवी चुकांमुळे झाले आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये तरुणांची संख्या अधिक आहे. 2013 ते 2016 दरम्यान राज्यातील महामार्गावर 51, 979 जणांचा अपघाती मृत्यू झाला. यातील 16, 403 मृत हे 18-25 वयोगटातील होते. त्यामुळे मागील 8 वर्षांपासून सरासरीनुसार दिवसाला 35 जणांचा अपघातात मृत्यू होत असल्याने महामार्ग मृत्यूचे सापळे बनत असल्याचे दिसून येत आहे.
वाहनचालकांवर कारवाई
महामार्ग वाहतूक विभागाने ‘गोल्डन अवर्स’सह लेन कटिंग, स्पीडिंग करणार्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यास सुरूवात केली. या दंडात्मक कारवायांची धास्ती घेत, वाहनचालकांनी महामार्गांवरील लेनची शिस्त आणि ओव्हरस्पीडवरचे पालन करण्यास सुरुवात केली. मात्र, आजही बेशिस्त चालकांवर कारवाईचा बडगा सुरूच आहे. 2016 मध्ये 113 कोटींची रक्कम दंडात्मक कारवाईतून राज्य महामार्ग पोलिसांच्या खात्यात जमा झाली होती. त्याच्या तुलनेत 2017 मध्ये दंडात्मक कारवाई अंतर्गत 175 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.