गोल्डन बेकरीला भीषण आग; 13 भट्ट्या जळून खाक

0

पुणे । गुलटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील प्रसिद्ध गोल्डन बेकरीला सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत डिझेलवर चालणार्‍या 13 भट्टया भस्मसात झाल्या. तसेच बेकरीमधील 40 फुटाचे झाडही या आगीमध्ये जळून खाक झाल्यामुळे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

गोल्डन बेकरीला लागूनच दाट झोपडपट्टी असलेली मीनाताई ठाकरे वसाहत असून आग वसाहतीत पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. दोन वर्षांपूर्वी येथे अशीच आगीची दुर्घटना घडली. यात 20 झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. गोल्डन बेकरीला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर वसाहतीतील नागरिक घराबाहेर पळाले. परंतु अग्निशामक दलाच्या कार्यतत्परतेमुळे बेकरीला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी कोंढवा, कात्रज व अग्निशामक दलाच्या मुख्य कार्यालयातून पाच अग्निशामक दलाच्या गाड्या व दोन पाण्याच्या टँकरच्या मदतीने अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून परिस्थिती आटोक्यात आणली. या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र डिझेल भट्ट्यांबरोबरच पत्र्याच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.