गोल्डन शनिवार!

0

एका दिवसात सहा सुवर्णपदकांची कमाई; भालाफेकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक
कुस्तीत पाच सुवर्णपदकांची कमाई, पदतालिकेत भारताचे तिसरे स्थान

गोल्ट कोस्ट (ऑस्ट्रेलिया) : 21व्या राष्ट्रकुल स्पर्धांत दहाव्या दिवशी भारतावर सुवर्णपदकांची बरसात झाली. विनेश फोगाटने भारताला सहावे सुवर्णपदक मिळवून दिले. एका दिवसात भारताला मिळालेले हे सहावे सुवर्णपदक ठरले आहे. अशाप्रकारचे सुवर्णयश भारताला यापूर्वी कधीच मिळालेले नाही. तसेच, भालाफेकीत भारताने पहिल्यांदाच सुवर्णपदक प्राप्त केले असून, अचूक भालाफेक करून नीरज चोप्रा याने 21 वे सुवर्णपदक भारताच्या खात्यात जमा केले. नीरज हा पहिलाच भालाफेक करणारा खेळाडू सुवर्णपदक विजेता ठरला आहे. दुसरीकडे, विनेश फोगाटने फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात कॅनडाच्या जेसिका मॅकडोनाल्ड हिला धूळ चारली. तर, तिची बहिण बबिता हिला मात्र सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. पदतालिकेत भारताचा तिसरा क्रमांक असून, आणखी सुवर्णलुटीसाठी देशवासीयांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.

भारताची सुवर्ण लूट सुरुच!
शनिवारी मेरी कोम, संजीव राजपूत, सुमित मलिक, गौरव सोलंकी यांनी देशाला सुवर्णपदके मिळवून दिली. साक्षीने कास्यपदक जिंकून दिल्यानंतर देशाच्या खात्यात आतापर्यंत 50 पदके पडली आहेत. सर्वाधिक पदके कुस्तीत मिळाली असून, आतापर्यंत पाच पदकांची कमाई झाली होती. तर नेमबाजीत सर्वाधिक पदके मिळाली असून, एकूण सात सुवर्णपदके नेमबाजीत प्राप्त झाली आहेत. या शिवाय, 5-0 अशा मोठ्या फरकाने मेरी कोमने क्रिस्टिना ओहारवर विजय मिळवत राष्ट्रकुल स्पर्धेतील आपले पहिले पदक हाशील केले आहे. मेरीच्या गोल्डन पंचनंतर भारताच्या खात्यात एकूण 18 सुवर्णपदके पडली आहेत.