नवी दिल्ली : गोल्फपटू एस. एस. पी. चौरसियाने रिओ येथील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील गैरव्यवस्थेबाबत आणि त्याला मिळालेल्या वागणुकीबाबतचे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए) आणि क्रीडा मंत्रालयावरील आरोप फेटाळून लावले आहेत. चौरसियाचे आरोप बिनबुडाचे आणि खोटे असून, आम्ही चौरसियाला ३० लाख रुपये देण्याचे कधीच कबूल केले नव्हते,’’ असे स्पष्टीकरण आयओएने पत्रकाद्वारे दिले आहे. यावेळी संघटनेने चौरसियावर केलेल्या खर्चाची यादीसुद्धा सादर केली असल्याचे सांगितले गेले आहे.
ऑलिम्पिक संपल्यावर चार महिन्यांनी तेथील गैरव्यवस्थेबद्दल चौरसिया आता तक्रार करीत आहे. एवढ्या उशिरा तो कसा जागा झाला, अशी टीका भारताचे ऑलिम्पिक पथकप्रमुख राकेश गुप्ता यांनी केली. रिओ येथील भारतीय क्रीडाग्राममध्ये अतिशय गैरव्यवस्था होती. तेथे आम्हाला नोकरांसारखे वागवण्यात आले, अशी तक्रार चौरसियाने केली होती. त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना गुप्ता म्हणाले, ‘‘तेथील वाहतूकव्यवस्थेची जबाबदारी सर्वस्वी स्थानिक संयोजन समितीकडे होती. भारतीय पथकाच्या पदाधिकाऱ्यांचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. अभिनव बिंद्रा, लिएण्डर पेस यांच्यासह अनेक नामवंत खेळाडूंनी तेथील स्थानिक वाहनव्यवस्थेचाच उपयोग केला होता.