मुंबई । शेलारमामा फाऊंडेशनने जय भारत सेवा संघाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत गोलफादेवी प्रतिष्ठान, अंकुर, ओम ज्ञानदीप यांनी महिला,तर भवानीमाता, जय खापरेश्पर यांनी पुरुष गटात विजयी सलामी दिली. श्रमिक जिमखाना येथे शेलारमामा चषकासाठी सुरू झालेल्या कबड्डी स्पर्धेतील महिलांच्या उदघाटनिय सामन्यात गोलफादेवी प्रतिष्ठानने ओम् साईचा 47-30 असा पाडाव केला. मध्यांतराला 24-11 अशी गोलफादेवीकडे आघाडी होती. पूर्वार्धात सोनाली जागडे, अस्मिता जंगम यांच्या यांनी आपल्या धारदार खेळाने गोलफादेवीला मोठी आघाडी मिळवून दिली, पण उत्तरार्धात मात्र साईच्या धनश्री कदम, मीनाक्षी नाईक यांनी जोरदार कमबॅक करत सामन्यात रंगत आणली.
दुसर्या सामन्यात अंकुरने सिद्धीचा 50-10असा धुव्वा उडविला. मध्यांतरालाच 35-02अशी मोठी आघाडी घेत आपला इरादा स्पष्ट केला. नंतर सामन्याची औपचारिकता पूर्ण करीत सामना मोठ्या फरकाने आपल्या नावे केला. कांचन जुईकर, तृप्ती भाटकर यांच्या चतुरस्त्र खेळाला याचे श्रेय जाते.अंकुरच्या या झंजावाताला सिद्धीकडे उत्तरच नव्हते. महिलांच्या शेवटच्या चुरशीच्या सामन्यात ओम् ज्ञानदीपने मध्यांतरातील 14-20 अशा 6गुणांच्या पिछाडीवरून ओम् कबड्डी संघाचे आव्हान 39-28 असे मोडून काढत दुसरी फेरी गाठली. योगिता सपकाळ, आरती बांदल यांनी ओम् संघाला उत्तरार्धात आघाडी मिळवून दिली होती. पण उत्तरार्धात मात्र त्यांचा खेळ ढेपालला. ज्ञानदीपच्या विना पाटील, सोनाली पानवलकर यांनी उत्तरार्धात जोरदार आक्रमण करीत प्रतिपक्षांचे संरक्षण खिळखिळे करत भराभर गुण मिळविले. त्यांना काजल बिरवडकर हिने उत्कृष्ट पकडी करीत छान साथ दिली. म्हणूनच हा विजय साकारला.
पुरुषांच्या द्वितीय श्रेणी गटात भारतमाताने सर्वोदय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास 36- 07 असे सहज नमविले कल्पेश पवार, दर्शन तांबट यांच्या सर्वांगसुंदर खेळाच्या बळावर. पुरुषांच्या दुसर्या सामन्यात जय खापरेश्वरने आदर्शवर 39-19 असा विजय मिळवला. विजयी संघाकडून जयेश होरंबळे, सचिन सुर्वे, तर पराभूत संघाकडून सचिन राऊत, दीपेश कदम छान खेळले.