भुसावळ। शहरातील भारत नगर व पवन नगरातील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या मुकेश भालेराव यास शहर पोलीसांनी यावल तालुक्यातील बोरावल येथून गुरुवार 3 रोजी पहाटे 5.45 वाजेच्या सुमारास जेरबंद केले. भारत नगर येथे 25 रोजी रात्री निखील झांबरे यास मुकेश भालेराव, रानु बॉक्सर, गौरव बढे यांनी मारहाण करुन गोळीबार करण्यात आला होता. यात निखील झांबरे जखमी झाला होता. यातील मुख्य आरोपी मुकेश भालेराव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शहरासह अनेक पोलीस स्थानकात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
गोपनीय माहितीद्वारे केली कारवाई
वर्षभरापासून त्याला शहरातून हद्दपार करण्यात आले होते. भारत गोळीबार प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांनी पकडले असून मुख्य आरोपी मुकेश भालेराव गुन्हा झाल्यापासून पासून फरार होता. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र थांगपत्ता लागत नव्हता. परंतु यावल तालुक्यातील बोरावल गावात आरोपी आल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना मिळाली. काही वेळेनंतर आरोपी यावलला आल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वसंत मोरे यांना मिळाली. माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक के.टी. सुरडकर, एएसआय फारुक शेख, पोलीस कॉनस्टेबल कमलाकर बागुल यांनी यावल तालुक्यातील बोरावल गावात जावून आरोपी मुकेश भालेराव याला ताब्यात घेतले. त्यास शहर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल व वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास उपनिरीक्षक राहुल पाटील करीत आहे.