जखमी गुन्हेगार चितळकर यालाही पोलिसांनी केले सरळ
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – चिंचवड वाल्हेकरवाडी येथील शिवाजी चौकात झालेल्या गोळीबार प्रकरणाचा छडा चिंचवड पोलीसांनी अखेर लावला. याप्रकरणी चौघांना अटक करून दोन पिस्टल व पाच जीवंत काडतुसे जप्त केली आहेत. गोळीबारात जखमी झालेला सराईत गुन्हेगार जयवंत चितळकर यालाही ताब्यात घेवून पोलिसांनी त्याला वठणीवर आणले.
वाल्हेकरवाडीतील घटना
मंगळवारी (दि.20) भर रस्त्यात दुचाकी लावल्याच्या कारणावरुन झालेल्या भांडनात सराईत गुन्हेगार जयवंत चितळकर याला काही अज्ञात इसमांनी त्याच्या उजव्या हातावर गोळीझाडून त्याचा हात जखमी केला होता. याप्रकरणी त्याने पोलीसांची दिशा भूल करुन मी दारु पेऊन पडल्यामुळे लोखंडी सळई माझ्या हातात खुसली असल्याची खोटी माहिती दिली व तक्रार नोंदवण्यास नकार दिला होता. मात्र त्याच्या हाताची जखम ही बंदुकीच्या गोळीमुळेच झाली असल्याचे पोलीसांना तपासात समजले. यावर पोलीसांनी परस्पर गुन्हा दाखल करुन घेतला व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरु केला.
सीसीटीव्ही, फेसबुकव्दारे तपास
पोलीसांनी सर्वप्रथम घटना स्थळी भेट देऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यामध्ये त्यांना चार ते पाच जनांमध्ये मारामारी झाल्याचे समजले तसेच त्यांना घटना स्थळावरुन एक पुंगळी देखील सापडली. यावर पोलीसांनी प्राप्त फुटेजमधील वर्णनाच्या व्यक्तींचा फेसबुकवर शोध घेतला. तसेच त्यांचा फोन नंबर मिळवून त्यांना ट्रॅक केले असता तो पिंपळे गुरव येथील दौला जबार नदाफ (वय 27) याचा असल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता त्याने मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता शिवाजी चौकात घडलेला सर्वप्रकार सांगितला.
चितळकरने अडविली वाट
तो व मामा अजमत शेख हे त्यांच्या कार मधून तुपेवस्तीकडून शिवाजी चौकाकडे जात असताना रस्त्यामध्ये जयवंत चितळकर व त्याचा मित्र निलेश कोळपे यांनी दुचाकी लावून रस्ता अडवला होता. यावर अजमत यांनी त्यांना गाडी बाजूला घ्यायला सांगीतली असता चितळकर व त्याच्या मित्र निळेश कोळपे याने त्याला शिवीगाळ करुन मारहाण केली. अजमत याने त्याच्या भाचा दौला याला ही घटना सांगितली यावर दौला व त्याचे तीन साथीदार अजमत शेख (वय 28, रा.वेताळनगर), सद्दाम शौकत अली नदाफ (वय 27, रा बिजलीनगर चिंचवड), शिवाजी तानाजी सोलनकर (वय 21, रा. मोरयानगर, चिंचवड) हे तेथे जाब विचारायला गेले असता चितळकर व निळेश कोळपे यांनी त्यांना ही मारहाण करुन त्यांच्यावर पिस्तूल उगारली.
झटापटीत दंडाला गोळी
यावर नदाफ याने त्याच्या हातातील पिस्टल हिसकावून घेत असता झालेल्या झटापटीत जयवंत चितळकर यांच्या उजव्या हाताच्या दंडात गोळी लागली. तसेच ती पिस्टल घेऊन तो फरार झाला होता. तसेच शुक्रवारी पोलीस निरीक्षक सतिश कांबळे यांना जखमी निलेश कोळपे याच्याकडे सुध्दा पिस्टल असल्याचे गुप्त माहिती मिळाली यावर पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या कडून एक पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त केली आहे.