गोळीबाराच्या घटनेने पुन्हा हादरले भुसावळ

0

भुसावळ । अतिसंवेदनशील शहर असलेले भुसावळ गेल्या वर्षभरापासून शांततेत होते. मात्र पुन्हा रविवार 25 रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहर पुन्हा हादरले असून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसिध्द मल्ल मोहन बारसे यांच्या खुनानंतर शहरात तीन वेळेस गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. या घटना ताज्या असताना पुन्हा शहरातील सोमाणी गार्डन जवळील पवन नगर भागात दोन्ही भावंडांवर गोळीबार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

 

रात्रीच्या सुमारास धुमाकूळ
शहरातील भारत नगरपरिसरात रविवार 25 रोजी या गुंडांनी धुमाकुळ घालून पवन नगरात रात्री 10.30 वाजेच्या सुमारास गौरव बढे, मुकेश भालेराव, रानु बॉक्सर यांसह अन्य तीन जण मोटारसायकलने जात असताना त्यांना सुमित किशोर झांबरे व त्याचा भाऊ रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घरासमोर रस्त्याच्या कडेला उभे होते.

सहा जणांनी मिळून केला दोघा भावांवर प्राणघातक हल्ला
यावेळी वाहनांवरील तीघांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने निखील झांबरे यास लाथ मारली असता सुमित झांबरे जाब विचारण्यास गेल्यास निखील यास एकाने डोक्यात फर्शी मारली. मुकेश भालेराव याने त्याच्या जवळील बंदूकीने निखील याच्या डाव्या पायाच्या मांडीवर गोळी झाडली व सुमित यास एकाने चाकूने डाव्या बाजून कमरेच्या खाली वार केला व इतर तीन जणांनी पाठीवर, हातावर, लोखंडी पाईपने मारुन गंभीर दुखापत करुन निखील व किशोर यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

 

जखमी निखील झांबरेवर शस्त्रक्रिया
याबाबत सुमीत झांबरे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना तातडीने भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मध्यरात्रीच जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवार 26 रोजी निखीलवर शस्त्रक्रिया करून त्याच्या मांडीत असलेली गोळी काढण्यात आली. दोन्हींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले आहे.

 

तपासासाठी दोन पथके रवाना
शहर पोलीस स्थानकाचे दोन पथक हल्लेखोरांच्या शोधार्थ रवाना करण्यात आली आहेत. एक पथक जळगाव तर दुसरे पथक भुसावळ तालुक्यात हल्लेखोरांचा कसून तपास करीत आहे. उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या घराच्या परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले असून हल्लेखोर या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. शहरात रात्री 10 वाजेनंतर दुकाने बंद, कायदा व सुव्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचे दिसते. प्रत्यक्षात कायदा व सुव्यवस्था फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहे. त्यांनाच नियम असतात हे वारंवार सिध्द झाले आहे. पोलीस सामान्य जनतेवरच कायदा लादतात. हद्दपार करण्यात आलेले आरोपी शहरात येवून दहशत माजवून जातात याची पोलीसांना माहिती नसते का? अशा गुन्हेगारांसाठी पोलीस प्रशासनाचा कायदा व सुव्यवस्था नसते का? अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत असल्याचे दिसून येते.

हद्दपार आरोपी
दरम्यान हल्लेखोरांचे टोळके महात्मा फुले नगरात जावून दहशत माजवून आले होते. भारत नगर व पवन नगर येथे देखील त्यांनी दहशत माजविली यातील मुकेश भालेराव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शहरासह इतरही पोलीस स्थानकात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून गेल्या एक वर्षापासून त्याला शहरातून हद्दपार करण्यात आलेे आहे. तसेच गौरव बढे रानू बॉक्सर यांच्यावर सुध्दा गुन्हे दाखल आहेत. या तीघांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. महात्मा फुले नगरात गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून ़7 एमएम आकाराची बंदुकीची रिकामी पुंगळी जप्त केली आह़े. या भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आह़े. अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग, सहाय्यक पोलीस अधिक्षक निलोत्पल तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीसांनी चौकशीसाठी भालेवर व बढे यांच्या नातेवाईवाईकांची चौकशी देखील केली.