गोळीबाराने पुन्हा भुसावळ हादरले ; एक जण जखमी, चौघांना अटक

0

व्याजाचे पैसे न दिल्याने वाद विकोपाला ; हवेतही झाडली गोळी

भुसावळ- व्याजाचे घेतलेले पैसे परत न दिल्याने संशयीताने थेट गोळीबार करून एकाला जखमी केल्याची घटना शहरातील नाहाटा चौफुलीजवळील हॉटेल गजाननजवळ रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. शस्त्र तस्करीचे केंद्र ठरू पाहणार्‍या भुसावळात पुन्हा गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक करण्यात आली.

व्याजाचे पैसे न दिल्याने गोळीबार
तक्रारदार सागर विनायक पत्की (गंगाराम प्लॉट, भुसावळ) याने संशयीत आरोपींकडून व्याजाने 35 हजार रुपये घेतले होते तर त्यातील आठ हजार रुपयांची रक्कम परत केली होती मात्र उर्वरीत रकमेसाठी आरोपींनी तगादा सुरू करीत तक्रारदाराला नाहाटा चौफुलीजवळील एका हॉटेलवर भेटण्यासाठी रविवारी सायंकाळी बोलावले होते. पैशांवरून संशयीत योगेश तायडेने वाद वाढवत दहशत निर्माण करण्यासाठीसागर पत्कीच्या उजव्या पायाच्या पंजावर एक गोळी झाडली तर अंगावर कट्टा रोखत हवेत एक गोळी झाडली. यानंतर अन्य संशयीत हेमंत निंभोरे, हरीष लोखंडे व अन्य एक अनोळखीने पत्की यास बेदम मारहाण करीत पळ काढला.

रात्रभर आरोपींचा शोध
रविवारी रात्री घटना घडल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांना घटनास्थळी धाव घेत आरोपींचा कसून शोध सुरू केला. सोमवारी मुख्य आरोपी योगेश देविदास तायडे (25, रा.नाहाटा कॉलेजमागे, महेश नगर, भुसावळ) हेमंत विजय निंभोरे (20, रा.गंगाराम प्लॉट, भुसावळ), हरीश अनिल लोखंडे (20, रा.गंगाराम प्लॉट, भुसावळ) तसेच अक्षय सोनवणे (हद्दीवाली चाळ, भुसावळ) यास बाजारपेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, संजय भदाणे, विकास सातदिवे, दीपक जाधव, कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, उमाकांत पाटील, राहुल चौधरी, बंटी कापडणे आदींनी शहरातील सिंधी समाज स्मशानभूमीजवळून अटक केली. आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात सागर पत्कीच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सोमवारी सायंकाळी आरोपींची कसून चौकशी केली. तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विवेक नरवाडे करीत आहेत.