गोळीबाराने पुन्हा हादरले भुसावळ

0

बसस्थानकातील घटना; कुविख्यात आरोपीने साथीदारावर चालवली गोळी; एक बचावला

गणेश वाघ

भुसावळ– भुसावळात गुरुवारी रात्री पुन्हा साडेनऊ वाजेच्या सुमारास गोळीबार होवून एक जण जखमी झाला तर ओलीस ठेवलेला दुसरा सुदैवाने बचावल्याची घटना बसस्थानकात घडली. विशेष म्हणजे पोलीस दप्तरी लुटीसह खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या संशयीतांनेच आपल्याच सहकार्‍यावर रूबाब झाडण्यासाठी गोळी चालवत त्यास केले व सोबत त्यास घेऊन पोबारा केला असून या घटनेने पोलीस प्रशासनही चक्रावले आहे. रात्रभर शोध घेऊनही आरोपी व जखमी न मिळाल्याने या प्रकरणातील गुंता अधिकच वाढला आहे. आरोपींना पलायन करण्यास मदत करणार्‍या अल्पवयीन तरुणास पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.

रुबाब झाडण्यासाठी सहकार्‍यावरच चालवली गोळी

घटनास्थळावरून समजलेल्या माहितीनुसार, लूट तसेच गोळीबार प्रकरणातील संशयीत आरोपी अजय गोंडाले याने बसस्थानकावर शौचालयाचा ठेका घेतला आहे. गुरुवारी त्याच्यासह साथीदार शौचालयाच्या एका कक्षात मद्यपान करीत असताना भाजीपाला व्यावसायीक दीपक गोपाळ काटकर (35, टींबर मार्केट, भुसावळ) हा शौचासाठी आल्यानंतर संशयीत अजयने गावठी कट्ट्याचा धाक दाखवत त्यास मद्यप्राशन करण्यास भाग पाडले. काटकरने नकार दिल्याने आरोपीने गोळीबार करण्याची धमकी देत बसस्थानकाच्या आवारात हवेत एक गोळी झाडल्याने काटकर याने घाबरून मद्यप्राशन केले तर शौचालयाचे काम पाहणार्‍या सचिन (20, रा.सावदा) या आपल्या सहकार्‍याच्या डाव्या हातावरच गोळी चालवून त्यास जखमी केले. या घटनेनंतर काटकर यास ओलीस ठेवत आरोपी अजय, जखमी सचिन व दीपक हे दुचाकीद्वारे जखमीला उपचारार्थ हलवण्यासाठी बाहेर निघाले असतानाच अजयचा साथीदार किसन तेथे आला. चारही जण एका दुचाकीवर निघाले असतानाच आणखी एका अल्पवयीन सहकार्‍याच्या मदतीने दोन दुचाकींवर पाच जण वरणगावच्या दिशेने निघाले मात्र अल्पवयीन साथीदार अर्ध्या रस्त्यातूनच माघारी परतला. जखमी सचिनसह काटकर यांना ठार मारू यावरून उभय कुविख्यात अजय व किसनमध्ये काही वेळ वादही चालल्याची माहिती असून या प्रकारात काटकर याने आपला जीव कसाबसा वाचवत नातेवाईकांना व पोलिसांना माहिती दिल्याने पोलिसांनी दीपनगरजवळून काटकर यास ताब्यात घेतले.

जखमी साथीदारासह तिघे पसार
गोळीबारात जखमी झालेल्या जखमी सचिनसह आरोपी अजय व किसन हे वरणगावच्या दिशेने निघाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या मात्र शुक्रवारी पहाटे सहा वाजेपर्यंत शोध घेऊन आरोपी न मिळाल्याने ते वरणगाव परीसरातील जंगलात वा अन्य ठिकाणी पसार झाल्याचा दाट संशय आहे. काटकर यांच्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलिसात शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.