गोळीबाराविरोधात अमळनेरातील व्यापारी रस्त्यावर

0

दुकाने बंद ठेऊन व्यापार्‍यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

अमळनेर: – अमळनेर येथील लुटपाटच्या उद्देशाने रात्री व्यापार्‍यावर झालेल्या गोळीबारच्या विरोधात शहरातील व्यापार्‍यांनी रस्त्यावर उतरून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. तसेच सर्व व्यापार्‍यांनी आपली दुकाने व प्रतिष्ठाने देखिल बंद ठेवली होती. व्यापार्‍यावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास शहरातील कैलास ट्रेडिंगचे मालक बसंतलाल बितराई व त्यांचा मुलगा अजय हे दुकान बंद करून मोटार सायकलने घरी जात असतांना शहरातील नर्मदा वाडी जवळील त्यांच्या घराजवळ दोन अज्ञात व्यक्तीनीं मोटार सायकलवर येवून त्यांच्या जवळील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी त्यांनी गोळीबारही केला. मात्र गोळी दोघांच्या मधून गेल्याने मोठा अनर्थ टळला. यात संशयित आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले.

व्यापार्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण

ही घटना घडल्याने व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. घटनेचा निषेध म्हणून शहरातील व्यापारी वर्गाने दुकान बंद करून अमळनेर प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना निवेदन देऊन गुन्हेगारांना त्वरित अटक करून त्यांच्या वर कठोर कारवाई करावी अश्या आशयाची मागणी केली आहे. याप्रसंगी लालचंद सैनांनी, भरत ललवाणी, संजय वाणी, राकेश ललवाणी, श्रीराम प्रॉव्हिजन, किशोर बितराई, जगमल सैनानी, अनिल कोराणी, मूलचंद तोलांनी, पुरुषोत्तम शेटे, कैलास पाटील, विलास चौधरी, कन्हैयालाल सैनानी, प्रवीण सरोदे आदी व्यापारी वर्ग उपस्थित होते.

अमळनेर शहरात 150 पेक्षा अधिक गावठी कट्टे – आमदार अनिल पाटील

मी निवडून आल्यानंतर लगेच जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे एक तक्रार केली होती. मात्र तरीही वाढत्या शस्त्र गुन्ह्यांचे प्रकार वाढीस लागले आहेत.यामुळे आपण केलेल्या तक्रारीप्रमाणे वॉश आऊट सारखी कोणतीही मोहीम राबवली गेली नाही असे दिसते. वारंवार व्यापारी वर्ग गुन्हेगारांकडून लक्ष केले जात असून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात तब्बल 150 च्या वर गावठी कट्टे आहेत.याबाबत पोलीस दलाकडून कोणतीही मोहीम राबविण्यात आलेली नाही. छोटे मोठे गुन्हेगार सर्रास गावात फिरतात त्यांचे कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येत नाही, ही बाब शहराच्या दृष्टीने लाजिरवाणी असून याबाबत पोलिसांनी तातडीने दखल घेऊन उचित कारवाई न केल्यास याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे गंभीर तक्रार करणार असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.