कुटुंब विरोधकांच्या दहशतीखाली असल्याने आत्महत्त्येशिवाय पर्यायच नाही
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचा दावा
पिंपरी-चिंचवड : महिलेवरील गोळीबार प्रकरणात अॅड. सुशील मंचरकर यांना राजकीय वादातून गोवले आहे. फिर्यादी महिला जाणीवपूर्वक माझ्या पतीच्या विरोधात खोट्या तक्रारी करत आहेत. या महिलेला आमच्या विरोधकांचे पाठबळ आहे. त्या महिलेचा आमचा काही संबंध नाही. गोळीबार झालेल्या दिवशी पती माझ्यासोबत होते. त्यामुळे गोळीबार प्रकरणात त्यांचा कसलाही संबंध नसून त्यांना राजकीय हेतूने गोवले असल्याचा दावा, मंचरकर यांच्या पत्नी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका गीता मंचरकर यांनी केला. तसेच आपले कुटुंब विरोधकांच्या दहशतीखाली वावरत असून आम्हाला आत्महत्या करण्याखेरीज पर्याय राहिला नसल्याचेही, त्या म्हणाल्या.
महिलेवर झाला होता गोळीबार
विरोधी पक्षनेत्याच्या दालनात सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने उपस्थित होते. पिंपरी, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी वसाहतीमध्ये एका महिलेवर शनिवार (दि.9) अज्ञातांनी गोळीबार केला होता. याप्रकरणी अॅड. सुशील मंचरकर यांना शुक्रवारी (दि.15) सायंकाळी पोलिसांनी अटक केली आहे.
आम्हाला धमक्या, मुलींना त्रास
या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंचरकर म्हणाल्या, एक नगरसेविका म्हणून आपण सक्षमपणे काम करत आहोत. मात्र, प्रभागातील राजकीय विरोधकांनी आपले जगणे मुश्किल केले आहे. आपण प्रभागातील नागरिकांशी संवाद साधायला गेल्यानंतर विरोधक व त्यांचे साथीदार पाळत ठेवतात. भरसभेत आपल्यावर हल्ला देखील केला होता. अनेक खुनाच्या खटल्यात आरोपी असलेले विरोधक पोलिसांना हाताशी धरुन खोट्या पुराव्याच्या आधारे पती अॅड. सुशील मंचरकर यांना गुन्ह्यांमध्ये गोवले जात आहे. आपल्या दोन मुलींनाही त्यांच्यामार्फत गुंडांकडून त्रास दिला जातो. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. सतत दहशत, धमक्या, पाळत ठेवून आपल्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचा, आरोपही त्यांनी केला.
जगणे झाले मुश्किल
याबाबत मुख्यमंत्री, राज्य महिला आयोग, मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी योग्य तपास करुन ’दूध का दूध पाणी का पाणी’ करावे. विरोधकांमुळे आमचे कुटुंब दहशतीखाली वावरत असून त्यांच्यामुळे आपले जगणे मुश्कील झाले आहे. त्यांच्या दहशतीमुळे आपल्यापुढे आत्महत्या करण्याखेरीज पर्याय राहिला नसल्याचेही, त्या म्हणाल्या.