भुसावळ। शहरातील भारतनगर आणि पवननगरात गोळीबार प्रकरणात शहर पोलिसांनी शुक्रवार 14 रोजी पहाटे 4.15 वाजेच्या सुमारास फरार असलेल्या गौतम सोनवणे या आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे.
सापळा रचून केली कारवाई
भारत नगर आणि पवन नगरात 25 जून रोजी रात्री गोळीबाराची घटना घडली होती. गोळीबारात निखील झांबरे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याचा भाऊ सुमित झांबरे आरोपींनी केलेल्या चाकू हल्यात जखमी झाला आहे. सुमितच्या फिर्यादी वरुन शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आठ आरोपी अटक करण्यात आले आहेत. गौतम सोनवणे हा शुक्रवारी प्रभाकर हॉल जवळील त्याच्या घरी येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने सापळा रचुन डीबी पथकाचे बंटी सैंदाणे, सुनील थोरात, कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, दिपक जाधव यांनी त्यास पहाटे 4.15 वाजेला ताब्यात घेतले.
मुकेश भालेराव अद्यापही फरार
गोळीबारची घटना घडली तेव्हापासून पोलिस त्यांचा कसुन शोध घेत होते. संशयितांच्या शोधार्थ पोलिसांची पथके औरंगाबाद, मुंबई, इंदोरसह अन्य ठिकाणी रवाना झाली होती. सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत मोरे अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणातील प्रमुख व हद्दपार आरोपी मुकेश भालेराव हा अद्यापही फरार असून पोलीस पथक त्याचा ठिकठिकाणी तपास करीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.