गोळ्यांनी चाळण झालेला लेफ्टनंटचा मृतदेह सापडला

0

जम्मू। काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात बुधवारी भारतीय सैन्यातील लेफ्टनंट दर्जाच्या एका अधिकार्‍याचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गोळ्यांनी संपूर्ण शरीराची चाळण झालेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला. उमर फैयाज असे या मृत अधिकार्‍याचे नाव असून, ते कुलगाम येथे राहत होते. बुधवारी सकाळी शोपियान जिल्ह्यातील हरमन येथे त्यांचा मृतदेह सापडला. सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी मंगळवारी उमर फैयाज यांचे अपहरण केले असावे. त्यानंतर उमर यांना गोळ्या घालून हरमन येथे त्यांचा मृतदेह फेकून दिला असावा. सध्या स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला होण्याचा धोका आणखी वाढला आहे.

उमर अलीकडेच डिसेंबर 2016 मध्ये सैन्यात दाखल झाले होते. काल ते एका कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. उमर यांना इतक्या निर्घृणपणे का मारण्यात आले, यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपूर्वीच कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. जून 1994 मध्ये जन्मलेले उमर जम्मूतील अखनूर भागात तैनात असलेल्या राजपुताना रायफल्सच्या दुसर्‍या बटालियनमध्ये कार्यरत होते. उमर यांनी 2015 मध्ये एनडीएमधून पास झाल्यावर इंडियन मिलिटरी अ‍ॅकेडमीमध्ये प्रवेश मिळवला होता. 10 डिसेंबर 2016 रोजी त्यांना सैन्यात कमिशन मिळाले होते. 8 जूनला ते आपला 23 वा वाढदिवस साजरा करणार होते.

वडील छोटे शेतकरी
22 वर्षीय उमर यांच्या वडिलांच्या सफरचंद विक्रीचा व्यवसाय आहे. उमर रजेवर घरी आले होते. एका परिचिताच्या लग्नात सहभागी होण्यासाठी ते शोपियान येथे गेले होते. उमर यांचा मृतदेह त्यांच्या घरापासून 30 किलोमीटर अंतरावर सापडला. सैनिकी इतमामात उमर यांचा दफनविधी करण्यात आला. उमर डॉक्टर असल्याचे काही लोकांचे म्हणणे होते, पण ते डॉक्टर नसून एनडीएच्या 129 व्या तुकडीतील डेल्टा स्क्वॉड्रनमध्ये लेफ्टनंट होते. एनडीएमध्ये उमर हॉकी संघाचे कर्णधार होते. याशिवाय ते व्हॉलिबॉलही चांगले खेळायचे.

रणनीती बदलतेय
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी निमलष्करी दलांच्या जवानांविरोधात टोकाची भूमिका नेहमीच घेतली होती. पण लष्करातील एखाद्या जवान किंवा अधिकार्‍याची मागील काही वर्षांमध्ये पहिल्यादाच अशा पद्धतीने निर्घृण हत्या केली आहे. निवृत्त लेफ्टनंट जनरल सैयद अता हुसैनन यांच्या मते काश्मिरी लष्करी अधिकार्‍याची हत्या करून अतिरेक्यांनी आपली रणनीती बदलल्याचे स्पष्ट होते. यापुढे हे अतिरेकी शासकीय नोकरीत असलेल्या काश्मिरींना निशाणा करतील. त्यामुळे काश्मीरमधील सत्यतेला पुढे आणण्याची ही वेळ आहे असे हुसैनन म्हणाले.