गोवंडीत कर्करोग रुग्णांसाठी निवासव्यवस्था

0

३०० खोल्यांची इमारत सरकार ताब्यात घेणार
शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई :- परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयात देशभरातून रुग्ण येतात. मात्र राहण्याची व्यवस्था नसल्याने रुग्णालयाशेजारील फुटपाथ, उड्डाणपुलांखालील मोकळ्या जागेत रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक राहतात. या रुग्णांसाठी सरकारने व्यवस्था करायला हवी अशी मागणी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी केली असता सरकार अशा रुग्णांसाठी गोवंडीत निवासव्यवस्था करीत असून ३०० खोल्या असलेल्या तेथील इमारती ताब्यात घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली.

शिवसेना आमदार उल्हास पाटील यांनी लक्षवेधीद्वारे शिरोळा येथे कर्करुग्णांची संख्या वाढत असून या रुग्णांसाठी येथे विशेष रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली. याला उत्तर देताना डॉ. दीपक सावंत यांनी शिरोळा तालुक्यातील रुग्णांची टाटा कॅन्सर रजिस्ट्रीच्या माध्यमातून नोंद केली जाईल. त्याचप्रमाणे संपूर्ण कोल्हापूरमधील रुग्णांचीही माहितीही याच माध्यमातून घेतली जाईल. त्यानुसार येथील कर्करोग रुग्णांसाठी उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन दिले.

शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांच्या निवासाबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आपणही याबाबत प्रयत्नशील असल्याचे सांगून कर्करोग रुग्णांसाठी गोवंडी येथे निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेणार आहेत. या ठिकाणी कर्करोग रुग्णांना राहण्यासोबत केमोमुळे होणारे कॉम्प्लिकेशन रोखण्यासाठी डॉक्टरची नेमणूकही करण्यात येईल. त्याचप्रमाणे या रुग्णांना टाटा रुग्णालयात नेण्या-आणण्यासाठी वाहतूक व्यवस्थाही करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री म्हणाले.

खासगी रुग्णालयातील मेमोग्राफीचा खर्च सरकारने उचलावा
मुंबईसारख्या शहरात ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्णांची संख्या वाढत आहे. टाटा रुग्णालयात यासाठीची तपासणी करण्यासाठी लांबच लांब रांगा असतात. यामुळे बहुतांशी महिला तपासणी न करताच परतात. त्यामुळे ही व्यवस्था सरकारने खासगी रुग्णालयांत उपलब्ध करून द्यावी. तेथील उपचारांचा खर्च सरकारने उचलावा. अशा आजारांसंदर्भात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी अशी मागणी अजय चौधरी यांनी केली.