गोवंशाची वाहतूक करणारा तस्कर पोलिसांच्या ताब्यात

0

विरार : 3 ऑगस्ट रोजी पहाटे मुंबई अहमदाबाद महामार्गावरून गोवंश भरलेला टेम्पो जाणार असल्याची खबर नाला सोपारा येथील एका गोरक्षकाला मिळाली होती. मात्र साडेपाचच्या सुमारास पुन्हा आलेल्या खबरीनुसार लाल रंगाचा पीकअप टोल नाका क्रॉस करून वसई दिशेने पुढे गेल्याचे समजले. लागलीच गोरक्षकाने वसई दिशेने या गाडीचा पाठलाग करत पीकअपला वसंत नगरी येथे ओव्हरटेक करून थांबवले.

गाडीत काय आहे ही चौकशी केली. गोरक्षक आपली बाईक टेम्पोच्या पुढे उभी करून पाठीमागे पाहण्यासाठी गेला असता टेम्पो चालकाने गाडी सुरु करून बाईकला उडवून वसईरोडच्या दिशेने पलायन केले. गोरक्षकाने पुन्हा टेम्पोचा पाठलाग सुरु केला व शेजारून प्रवास करणार्या बाइकर्सना टेम्पोत गायी भरून चालल्याचे ओरडून सांगितले. त्यामुळे अनेक बायकर्स नागरिकांनीही टेम्पोचा पाठलाग केला व सदर टेम्पोला वसईतील मेरी व्हिला येथे थरारक पाठलाग करून गाठले व माणिकपूर पोलिसांना कळवून टेम्पोत भरलेल्या 8 गायी व 5 बैलाच्या बच्छड्यांची सुटका केली. याबाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात अवैध गोवंश वाहतुकी बाबत व पशुक्रुरता अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकास अटक करण्यात आली आहे. सुटका केलेल्या गोवंशाला सकवार येथील गोशाळेत ठेवण्यात आले आहे.