गोवंश हत्येविरोधात भाजप सरकार आक्रमक

0

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठ्या राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा आक्रमक हिंदुत्वाची कास धरली आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यावर राज्यातील गोवंश हत्या करणारे कत्तलखाने बंद होणे हे स्वाभाविकच होते. आता उत्तर प्रदेशपाठोपाठ गुजरातनेही गोहत्येविरोधात कडक भूमिका घेत, गाईची हत्या करणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरवला आहे. याशिवाय या गुन्ह्यात दोषी ठरणार्‍यास जन्मठेपेच्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी अवैध कत्तलखान्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. राज्यात भाजपचे सरकार आल्यावर हे कत्तलखाने बंद करण्याचे आश्‍वासन योगींनी दिले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहादेखील नेहमीच कत्तलखाने बंद करण्याचे ऊहापोह करत असतात. गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक डिसेंबर महिन्यात होणार असली तरी त्याचे वारे आतापासूनच वाहायला सुरुवात झाली आहे. गुजरातमधील निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला, तरी भाजपने राज्यात मोर्चेबांधणी करण्यास सुरू केले आहे.

शपथ घेताच कत्तलखाने बंद होण्यास सुरुवात
योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच राज्यातील अनेक अवैध कत्तलखाने बंद होण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे तेव्हा मुख्यमंत्री किंवा प्रशासनाने कुठल्याही स्वरूपाचा आदेश काढला नव्हता. बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकृतरीत्या प्रशासनाला आदेश दिल्यावर प्रशासन आणि पोलिसांच्या कारवायांनी वेग घेतला आहे. अवैधरीत्या होणारी गोमांस विक्री थांबवण्यासाठी पोलिसांनी राज्यात अनेक ठिकाणी धरपकड केली आहे. मेरठमध्ये बहुजन समाज पार्टीचे माजी मंत्री हाजी याकूब कुरेशी आणि माजी खासदार शाहिद अखलाख यांच्या मांस फॅक्टरीवर छापे घालण्यात आले. वाराणसीतील जैतापूर भागातील कमलगदहा येथे अवैधरीत्या चालवण्यात येणारा कत्तलखान्याला पोलिसांनी सिल केले. या कत्तलखान्यातून पोलिसांनी सुमारे 60 गाई जप्त करत 20 जणांना अटक केली. कानपूरमध्ये कत्तलखाने बंद केल्यावर त्यांच्या मालकांनी समाजवादी पार्टीचे आमदार इरफान सोलंकी यांची भेट घेऊन या प्रकरणाची सुनावणी न झाल्यास शहरात चक्काजाम करण्याचा इशारा दिला.

जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद
गुजरातच्या विधानसभेत पुढील आठवड्यात सुधारित प्राणी रक्षण विधेयक मांडण्यात येणार आहे. गुजरातमध्ये सध्या असलेल्या प्राणी रक्षण कायदा 1957 नुसार गाय आणि वासरांची हत्या करणे हा गुन्हा आहे. या कायद्यानुसार गुजरातमध्ये 3 ते 7 वर्षांची कैद आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. नवीत सुधारित कायद्यामध्ये त्यात बदल करण्यात आला आहे. नवीन विधेयकानुसार गाईची हत्या करणार्‍यास जन्मठेपेची शिक्षा आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकेल. या गुन्ह्याकरता वापरण्यात येणारे वाहनही जप्त होणार.