जळगाव। मंगळवारी विविध मंडळांकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शहरभर दहीहंडीचा उत्साह बघायला मिळाला. यासोबतच सुभाष चौकातील मानाची, तसेच सागरपार्कवरील एल.के. फाऊंडेशनची दहीहंडी पाहण्यासाठी जळगावकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सागरपार्कवरील दहीहंडी तरुण कुढापाच्या गोविंदाने फोडली तर सुभाष चौकातील मानाची दहीहंडी फोडण्यासाठी पथकांची चांगलीच दमछाक झाली होती. मात्र, रात्री अखेर गोफणाच्या सहाय्याने श्रीकृष्ण तरूण मंडळाने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. यानंतर सर्व गोविंदानी एकच जल्लोष केला होता. दरम्यान, तरुण गोविंदांची पथके मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचे प्रयत्न करीत असल्याचे चित्र दुपारपासूनच ठिकठिकाणी बघायला मिळत होते. शहरातील अनेक चौकांमध्ये दहीहंडीच्या ठिकाणी डीजे व लेझर शो आयोजित केलेला होता. रेन डान्सवर अनेक गोविदा कल्ला करताना दिसत होते. शिवतीर्थ मैदानावर आयोजित दहीहंडी पाहण्यासाठी जळगावकरांनी गर्दी केली होती. ढोल व ताशांचा गजर, डी.जे.चे दणाणून टाकणारे स्वर आणि गोविंदांचा तुफान जल्लोष सर्वत्र बघायला मिळाला. स्वातंत्र्य दिनाची सुटी असल्याने अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन सागर पार्क, शिवतिर्थ मैदान, सुभाष चौकात आले होते. शहरातील उपनगरांमध्येही दहीहंडीचा उत्साह संचारला होता. रामानंदनगर, दादावाडी, पोस्टल कॉलनी, खोटेनगर, पिंप्राळा या भागात सकाळपासूनच दहीहंड्या फोडण्यात आल्या, तर अनेक ठिकाणी चिमुकल्यांच्या दहीहंड्याचेही आयोजन करण्यात आले होते.
सुभाष चौक मंडळ
सुभाष चौक बहुद्देशीय मित्र मंडळातर्फे या मानाच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचे यंदा 50 वे वर्ष होते. दरम्यान पाच वाजेपासूनच ही मानाची हंडी फोडण्यासाठी मंडळांनी सहभागी होत होते. दरम्यान दहीहंडी बघण्यासाठी नागरीकांनी सायंकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी आयोजकांकडून गोविंदा पथकाला 1 लाख 11 हजार रुपयांचे बक्षिस जाहिर करण्यात आले होते. परंतू त्याला किमान 7 मनोरे लावण्याची अट घातली होती. मात्र, सायंकाळी उशीरापर्यंत कोणत्याच मंडळाला सात लावण्यात यश मिळत नसल्याने आयोजकांकडून पाच थर लावण्याची अट घालण्यात आली. त्यानंतर पाच थर लावून हंडी फोडण्यासाठी प्रत्येक मंडळाला एक संधी देण्यात आली. त्यानंतर जुने जळगावातील श्रीकृष्ण तरुण मंडळाने पहिल्याच प्रयत्नात पाच मानवी मनोरे लावून 40 फुटावर असलेली ही मानाची दहीहंडी रात्री 9.25 च्या सुमारास गोफनच्या सहाय्याने फोडून गोविंदा होण्याचा मान पटकाविला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, माजी उपमहापौर सुनील महाजन, शरद तायडे, गोविंद अग्रवाल, श्रीकांत खटोड, श्रीराम खटोड, उपाध्यक्ष मनिष अग्रवाल उपस्थित होते. यशस्वितेसाठी हरीश चव्हाण, प्रविण बांगर, नरेंद्र कापडणे, अशोक अग्रवाल, मयुर कासार, महेश गाला, टोनू शर्मा, आदित्य खटोड यांनी परिश्रम घेतले.
5 मनोरे रचणार्यांना दिली बक्षीसे
मानाची दहीहंडी फोडणार्या श्रीकृष्ण मित्र मंडळाला 11 हजार 501 रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तर दहीहंडी फोडण्यासाठी पाच थर लावणार्या मंडळांना देखील आयोजकांकडून प्रत्येकी 5 हजार रुपयांचे बक्षिस देण्यात आले.
सागरपार्कवर उत्साहाला उधाण
सागर पार्कवर एल.के.फाऊंडेशनतर्फे दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतमातेचे पूजन करण्यात आले. यावेळी जलसंपदामंत्री गिरिष महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पद्मश्री उज्वल निकम,आ. सुरेश भोळे, आ. चंद्रकात सोनवणे, जिल्हाधिकारी कीशोर राजे निंबाळकर, महापौर नितिन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, स्थायी सभापती वर्षा खडके यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमासाठी दहीहंडीनिमित्ताने भगवान श्रीकृष्णांच्या गीतांवर समुहनृत्यही सादर करण्यात आले. महिला, पुरुष, ढोलपथके आकर्षणाचा विषय बनले होते.