गोव्याची मुंबई झाली

0

मुंबई । गोवा विधानसभेत भाजप सत्ता राखेल, असे वाटले होते. पण इथल्या मतदारांनी त्रिशंकु विधानसभेचा कौल देऊन आश्‍चर्याचा धक्का दिला. स्पष्ट बहुमत न मिळवू शकलेल्या भाजपला राज्याचे माजी संघप्रमुख सुभाष वेलींगकर यांची हकालपट्टी महागात पडली. याशिवाय गतविधानसभेच्या निवडणुकीदरम्यान मतदारांना दिलेले वचन न पाळल्याचा फटका बसला.

दोनवर्षांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना केंद्रात संरक्षणमंत्री बनवल्यावर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी लक्ष्मीकांत पार्सेकर यांची वर्णी लागली. पण एवढ्या मोठ्या पदावर बसून सुद्धा पार्सेकर यांची ओळख एक मुखवटा अशीच राहिली. मागच्या निवडणुकीदरम्यान राज्यातील सर्व कॅसिनो बंद करण्याचे आश्‍वासन भाजपने गोयंकरांना दिले होते. पण हे वचन भाजपने पूर्ण केले नाही. याशिवाय शिवसेना, महाराष्ट्रवादी गोमातंक पक्ष आणि गोवा सुरक्षा मंचाने आघाडी केल्यामुळे भाजपच्या मतांची विभागणी झाली. याशिवाय आम आदमी पार्टीमुळेही भाजपच्या काही मतांवर परिणाम झाला.
उत्तर प्रदेशातील निकाल जाहीर झाल्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी गोव्यात भाजपच सरकार स्थापन करणार असे सांगितले.

त्यामुळे अन्य पक्षातून आणि अपक्ष म्हणून जिंकलेल्या आमदारांना भाजप आपल्याकडे खेचणार हे नक्की आहे. गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसला एक, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि जीएफपीला प्रत्येकी तीन ठिकाणी विजय मिळालेला आहे. बहुमत मिळवण्यासाठी भाजप कोणाला तरी आपल्या गळाला लावणार, हे शाह यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होते.