गोव्याचे उपमुख्यमंत्री ढवळीकर यांचे पद धोक्यात; दोन आमदारांचा भाजपात प्रवेश

0

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत विराजमान झाले. सावंत यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यात उपमुख्यमंत्री सुदीन ढवळीकर यांचाही समावेश आहे. परंतु आता ढवळीकर यांचे उपमुख्यमंत्रीपद धोक्यात आले आहे. कारण ढवळीकर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीच्या दोन आमदारांनी मंगळवारी मध्यरात्री भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे गोव्यातील राजकारणाला नवे वळण लागले आहे. गोवा विधानसभेत ढवळीकरांच्या पक्षाचे केवळ तीन आमदार असून त्यातील दोन आमदार फुटल्याने आता ढवळीकर एकटेच पडले आहेत. त्यामुळे त्यांचे उपमुख्यमंत्रीपद धोक्यात आल्याचे सांगितले जात आहे. आमदार मनोहर आजगांवकर आणि आमदार दीपक पावस्कर असे भाजपात प्रवेश करणाऱ्या आमदारांचे नाव आहे. या दोघांनीही विधानसभा अध्यक्ष मायकल लोबो यांना भाजपमध्ये महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचं विलिनिकरण करत असल्याचे पत्र दिले. त्यामुळे ३६ सदस्य संख्या असलेल्या गोवा विधानसभेत भाजपच्या सदस्यांचा आकडा १४ वर गेला आहे.

पक्षांतर कायद्यानुसार दोन तृतियांश सदस्यांनी पक्ष सोडून वेगळा पक्ष किंवा गट स्थापन केला किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यास त्या सदस्यांचे सदस्यत्व कायम राहते. एमजीपीचे एकूण तीन सदस्य होते. त्यापैकी दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या दोघांचेही सदस्यत्व कायम राहणार आहे. पावस्कर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचा दावा खुद्द पावस्कर यांनी केला आहे.