मुंबई । मुंबई सिटी एफसीची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) शनिवारी बलाढ्य एफसी गोवा संघाविरुद्ध लढत होत आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी संघाची सरस तयारी झाल्याचा विश्वास मुंबईचे प्रशिक्षक अलेक्झांड्रे गुईमाराएस यांनी व्यक्त केला. मुंबईला पहिल्या सामन्यात बेंगळुरू एफसीविरुद्ध 0-2 असे पराभूत व्हावे लागले होते, पण शनिवारी मुंबई फुटबॉल एरीनावर उतरणारा संघ वेगळा असेल अशी खात्री गुईमाराएस यांना वाटत आहे. ते म्हणाले की, गेल्या मोसमात आम्ही घरच्या मैदानावर चमकदार खेळ केला. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळण्यास आम्ही उत्सुक आहोत. गोव्याविरुद्धचा सामना खडतर असेल. आम्हाला कामगिरीत सुधारणा करावी लागेल. प्रत्येक संघाला सुरुवातीला संघर्ष करावा लागतो. पहिल्या सामन्याच्या तुलनेत आता आमचा संघ परिपूर्ण बनला आहे.
पहिल्या सामन्यात मुंबईचे आक्रमण सर्वोत्तम झाले नाही. त्यांना नेटच्या दिशेने मोजकेच फटके मारता आले. आता संघासाठी सरस परिस्थिती असल्यामुळे हे चित्र बदलण्याची गरज आहे. मुंबईला ब्राझीलचा प्रभावी मध्यरक्षक लिओ कॉस्टा याच्या अनुपस्थितीत खेळावे लागेल. गुईमाराएस म्हणाले की, काही क्षेत्रांत भक्कम खेळ झाला नाही अशा परिस्थितीला आम्हाला सामोरे जावे लागले. बलवंतसारखे काही महत्त्वाचे खेळाडू जायबंदी झाले, तर लिओला 12 मिनिटांनंतर मैदानाबाहेर बोलाविणे भाग पडले. मला मागील सामन्याची काळजी वाटत नाही. काही वेळा एखादा सामना चांगला ठरत नाही. एफसी गोवाला अॅड्रीयन कॉलुंगा याच्या गैरहजेरीत खेळावे लागेल. स्पेनचा हा स्ट्रायकर नसूनही सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईयीन एफसीविरुद्ध गोव्याने चांगली कामगिरी केली. गोव्याने 3-2 अशी बाजी मारली. दुसर्या सत्रात दोन गोल पत्करावे लागले तरी संघ आक्रमक दृष्टिकोन कायम ठेवेल असे लॉबेरा यांनी सांगितले. ते म्हणाले की, एखाद्या संघाला कामगिरी करायची असेल तर आपल्या दृष्टिकोनावर ठाम राहून खेळावे लागते. वेगळे काही करायचा प्रयत्न केला तर कामगिरी तेवढी चांगली होत नाही. लॉबेरा यांच्या अंदाजानुसार गोवा पहिल्या सेकंदापासून आक्रमक खेळ करेल. चेन्नईयीनविरुद्ध जशी उपयुक्त आघाडी घेतली तशी मिळाली तरी ते धडाका कमी करणार नाहीत. लॉबेरा म्हणाले की, आमची सुरुवात चांगली झाली.