पणजी- गेल्या काही दिवसांपासून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर कॅन्सरने त्रस्त आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे १४ आमदार सोमवारी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल भवनात पोहोचले. राज्यपालांनी आम्हाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण द्यावे, असे काँग्रेसचे म्हणणे असून राज्यपाल उद्या काँग्रेसच्या आमदारांना भेटीसाठी वेळ देतील, अशी शक्यता आहे.
मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाच्या आजारावरील उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोहर पर्रिकर आजारी असताना गोव्यात नेतृत्व बदल होणार नाही, अशी भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्षांनी रविवारी जाहीर केली. तर काँग्रेसनेही गोव्यात सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
गोवा विधानसभेत ४० जागा असून यात भाजपाचे १४ आमदार आहेत. मगोप व जीएफपीचे प्रत्येकी ३ आमदार आहेत. याशिवाय ३ अपक्ष आमदारांचाही भाजपाला पाठिंबा आहे. तर काँग्रेसकडे १६ आमदारांचे संख्याबळ असून राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे.