गोव्यात कार अपघातात सहा महिन्याच्या मुलीसह चार जण ठार

0

मडगाव:गोव्यातील कुंकळळी येथे आज कँन्टरने व स्वीफ्ट डिझायर कारमध्ये अपघात होउन कारमधील चौघेजण जागीच ठार झाले. यात एका सहा महिन्याच्या बालिकेचा समावेश आहे. भावाच्या लग्नासाठी रिझवान सयय्द हा कुवेतहून आज पहाटे आला होता. कारमधून आपले वडील, चुलत बहिण व तिच्या मुलीसह कर्नाटकातील कारवार जिल्हयातील दांडेली येथे जात असताना कुंकळळी येथील काकणामोडडी येथे अपघाताची ही घटना घडली.

सकाळी ६.३० साडेसहाच्या दरम्यान हा अपघात झाला यात रिझवान याची चुलत बहिण शबिना वासीम बेग (28) तिची सहा महिन्याची मुलगी आहिरा वासिम बेग, वडील कासिम आदम सय्यद (52) व कारचालक सददाम मेहबुब साब कैलयगार (21) हे जागीच ठार झाले तर रिझवान (25) हा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कुंकळळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विल्सन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विवेक हळणकर यांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला.