गोव्यात 83, पंजाबमध्ये 70 टक्के मतदान

0

पणजी/चंदिगड | गोवा व पंजाब विधानसभांसाठी शनिवारी पार पडलेल्या मतदानात विक्रमी मतदान नोंदवले गेले आहे. गोव्यामध्ये 83 टक्के तर पंजाबमध्ये 70 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागातर्फे देण्यात आली. पाच वाजेनंतरही अनेक ठिकाणी मतदार रांगेत उभे होते. गोव्यामध्ये शांततेत मतदान पार पडले तर पंजाबमध्ये काही ठिकाणी मतदान यंत्रणांनी (इव्हीएम) धोका दिल्याचा प्रकार घडला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या निवडणुकीत आम आदमी पक्ष प्रथम दिल्लीबाहेर आपले नशीब अजमावत असून, त्यांनी गोवा व पंजाबमध्ये सत्ताधारी पक्षांना चांगले आव्हान दिले होते. नोव्हेंबरमध्ये घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर ही निवडणूक भाजपसाठीही महत्त्वाची ठरली आहे. गोव्यामध्ये भाजप तर पंजाबमध्ये अकाली दलाची सत्ता आहे. पुढील आठवड्यात उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांत मतदान घेतले जाणार आहे. त्यानंतर पाचही राज्यांची एकत्रिक मतमोजणी 11 मार्चरोजी केली जाणार आहे.

पंजाबात आपकडून जोरदार लढत

गोव्यामध्ये सर्वाधिक 83 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागामार्फत सांगण्यात आले. विधानसभेच्या 40 जागांसाठी हे मतदान घेण्यात आले होते. सर्व
ठिकाणी अत्यंत शांततेत मतदान पार पडले. सायंकाळी पाच वाजेनंतरही बहुतांश ठिकाणी मतदार मतदानासाठी रांगेत उभे होते. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल, असेही निवडणूक अधिकार्‍यांनी सांगितले. रांगेतील मतदारांना मतदान करू देण्यात आले होते. पंजाबमधील 117 जागांसाठीही शांततेत मतदान पार पडले. या राज्यात अकाली दल, काँग्रेस आणि आम आदमी पक्षातच जोरदार लढत झाली आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे मतदारांत नाराजी असताना या राज्यांत भाजप जिंकले तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय मानला जाणार आहे. तर भाजपचा पराभव झाल्यास मोदींनाच जबाबदार धरले जाणार आहे.

गोव्यात पर्रिकरांची प्रतिष्ठा पणाला!

नवी दिल्लीच्या सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये घणाघाती सभा घेत पक्षाला अनुकूल वातावरण निर्माण केले होते. अकाली दल व भाजप या सत्ताधारी पक्षाची सध्या राज्यात सत्ता होती. या दोन्ही पक्षांना काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये जोरदार आव्हान उभे केले होते. काँग्रेस व आप स्वबळावर तर अकाली दल व भाजप यांनी युती करून ही निवडणूक लढली होती. गोव्यात केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी भाजपची धुरा सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वातील भाजपला महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीशी आघाडी केलेल्या तीन राजकीय पक्षांनी आव्हान दिले होते. त्यात शिवसेनेचादेखील समावेश होता. भाजप, तीन स्थानिक पक्षांची आघाडी, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष अशी चौरंगी लढत येथे पहावयास मिळाली आहे.