गोवा । हिरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमात दुसर्या उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्यात फातोर्डा स्टेडियमवर चेन्नईन एफसी आणि एफसी गोवा आमनेसामने येत आहेत. गोव्याला घरच्या मैदानावर हरवण्यासाठी चेन्नई सज्ज झाला आहे. या दोन्ही संघांमध्ये एकदाही बरोबरी झालेली नाही. नऊ लढतींमध्ये गोव्याने चार, तर चेन्नईने पाच विजय मिळविले आहेत. या लढतींत मिळून तब्बल 35 गोलांची नोंद झाली आहे. अशावेळी गोव्याचे मुख्य प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांनी आपली आक्रमक शैली कायम ठेवली तर यात आणखी भर पडेल. लॉबेरा यांनी सांगितले की, प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावरील गोलचा (अवे गोल) नियम आम्हाला ठाऊक आहे, पण त्यामुळे आम्ही शैलीत बदल करणार नाही. मागील सामन्यात बरोबरी चालली असतानाही आम्ही जिंकण्यासाठी खेळलो. संघाला असाच दृष्टिकोन कायम ठेवून खेळावे लागेल. गेल्या तीन सामन्यांत आम्ही गोलांची संख्या भरपूर राखली आहे.सलग तीन सामने जिंकत उपांत्य फेरी गाठताना गोव्याने 12 गोल केले. महत्त्वाचा बदल म्हणजे या 270 मिनिटांच्या खेळात त्यांच्याविरुद्ध एकच गोल झाला आहे.
गोव्याच्या आघाडी फळीचे बरेच कौतुक झाले असले तरी संपूर्ण संघ आक्रमण भेदक होण्यासाठी सक्रिय होता आणि बचावातील सुधारणेसाठी प्रयत्नशील होता असे सांगताना लॉबेरा यांनी बचाव फळीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, सांघिक खेळ केला नाही तर यश संपादन करणे अशक्य असते, पण फुटबॉलमध्ये गोल करणार्यांना प्रसिद्धी मिळते. माझ्यादृष्टिने संघात असे खेळाडू आहेत की जे कसून खेळतात आणि त्यांच्यामुळे इतरांना चमकण्याची संधी मिळते. सर्व 11 खेळाडूंनी चांगला खेळ केला नसता तर आम्ही उपांत्य फेरीत गेलो नसतो. चेन्नईचा बाद फेरी गाठतानाचा फॉर्म सातत्यपूर्ण नाही. गेल्या पाच सामन्यांत त्यांना केवळ दोन विजय मिळविता आले आहेत, पण यंदा अवे सामन्यांत त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. यात सर्वाधिक सात क्लीन चिट आणि सर्वांत कमी प्रतिस्पर्ध्यांचे शॉट (78) अशी ही आकडेवारी आहे.
दुसर्या टप्प्याचा सामना 13 मार्च रोजी चेन्नईत
चेन्नईकडून 12 जणांनी गोल केले आहेत. दुसरीकडे गोव्याचा संघ बहुतांश फेरॅन कोरोमीनास आणि मॅन्युएल लँझारोटे यांच्यावर अवलंबून राहिला आहे. गोव्यासाठी घरच्या मैदानावरील 22 पैकी 18 गोल या दोघांनी केले आहेत. चेन्नईचे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांनी सांगितले की, आम्ही साखळीत दुसरा क्रमांक अपघाताने मिळविलेला नाही. आम्ही गोव्यात आणि पुण्यात जिंकलो, पण नॉर्थइस्टमध्ये हरलो. निर्णायक सामने जिंकण्याकडे आमचा कल असल्याचे दिसून येते. आम्ही बाद फेरीतील स्थान कमावले आहे. आता आम्हाला शून्यातून सुरवात करावी लागेल. साखळीतील गुण आता गणले जाणार नाहीत. आता केवळ उपांत्य आणि अंतिम फेरी असून आम्ही त्यासाठी सज्ज झालो आहोत. ग्रेगरी यांनी मागील सामन्यानंतर खेळाडूंना बरीच विश्रांती घेऊ दिल्याचेही सांगितले. आता सर्व जण सज्ज झाल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुसर्या टप्याचा सामना 13 मार्च रोजी चेन्नईत होईल.