गोसासीला भरधाव कंटेनरने वृद्धास चिरडले

0

राजगुरुनगर : शिरूर-भीमाशंकर राज्यमार्गावरील गोसासी (ता. खेड) येथे पायी जाणारे वृद्ध वामन सखाराम गोरडे (वय 65, रा. गोसासी, ता. खेड) यांना भरधाव कंटेनरने चिरडले. हा अपघात सोमवार (दि. 21) रात्रीच्या सुमारास घडला. या अपघातानंतर बेभान कंटेनर चालकाने कंटेनरसह पळ काढला. राजगुरूनगरच्या दिशेने सुसाट जाताना त्याने अनेक वाहनांना हुलकावणी दिली. होलेवाडी येथे या कंटेनरने एका तीनचाकी टेम्पोलादेखील उडविले. दुसर्‍या घटनेनंतरही चालकाने कंटेनर थांबवला नाही. गोसासीपासून काही नागरिकांनी कंटेनरचा पाठलाग सुरू केला होता. त्यांनी होलेवाडी गावाच्या हद्दीत हा कंटेनर रोखून कंटेनर चालक आणि क्लीनरला बेदम चोप दिला. याप्रकरणी कंटेनर चालक सुरेश किसन बजबळकर (वय 29, रा. मंगळुरपीर, जि. वाशिम) याला खेड पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मयत वामन गोरडे यांचा मुलगा रामकृष्ण गोरडे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कनेरसरहून निघाला होता कंटेनर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर चालक सुरेश बजबळकर याने मादक द्रव्याचे सेवन केले होते. अशा परिस्थितीत तो लोखंडी मालाची वाहतूक करणारा कंटेनर (एमएच 04 एके 6158) घेऊन कनेरसरहून राजगुरुनगरच्या दिशेने सोमवारी सायंकाळी निघाला होता. कनेरसरहून गोसासीमध्ये आल्यानंतर रस्त्यावरून पायी जाणार्‍या वामन गोरडे यांना धडक दिली. त्यानंतर सुमारे पाच ते सात किलोमीटर अंतर तो कापून होलेवाडी आला. या गावात त्याने एका तीनचाकी टेम्पोला जोरात धडक दिली. या धडकेत टेम्पोचा चक्काचूर झाला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.

ग्रामस्थांनी केला पाठलाग
गोसासी आणि होलेवाडीतील संतप्त ग्रामस्थांनी कंटेनरचा पाठलाग गेला. यामध्ये रस्त्यात कंटेनर थांबवून कंटेनर चालक आणि क्लिनरला चांगला चोप दिला. कंटेनरची काचा फोडून आतमध्ये लपलेल्या चालकाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असताना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खेड पोलिसांनी तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली व चालकाला ताब्यात घेतले. तसेच कंटेनरही घटनास्थळावरून हलवून पोलीस ठाण्याच्या आवारात आणला.

पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप
कंटेनर चालकाने वृद्धास चिरडल्यानंतरही घटनास्थळी न थांबता पलायन केले. पुढे कंटेनर भरधाव चालवून एका तीनचाकी टेम्पोलाही धडक दिली. तरीही तो कंटेनर चालक थांबला नाही. म्हणून ग्रामस्थ संतापले होते. शेवटी पाठलाग करून त्याला होलेवाडी गावाच्या हद्दीत अडविण्यात आले. संतप्त ग्रामस्थांनी चालकासह क्लिनरला बेदम चोप दिला. संतप्त जमावाने कंटेनर जाळून टाकला असता. या घटनेची माहिती होताच, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून संतप्त ग्रामस्थांना शांत केले. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.