गोहत्या करणार्‍यास होणार जन्मठेप

0

अहमदाबाद । गोहत्या प्रकरण आता पुन्हा एकदा गाजत असून गोहत्याबंदीसाठी गुजरात सरकारने अतिशय कठोर पावले उचलली आहेत. गुजरातमध्ये गोहत्या प्रकरणात दोषी आढळणार्‍यांना आता आजीवन कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. शुक्रवारी (31 मार्च) गुजरात सरकारने गो-संरक्षण कायद्यात केलेल्या दुरुस्तीनुसार दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. गुजरात सरकारच्या या निर्णयावर सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जातंय्.

गुजरातमध्ये पूर्वीही गो-संरक्षण कायदा लागू होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री पद सांभाळत असताना त्यांनी सुधारित कायदा अंमलात आणला. याच कायद्यात आता दुरुस्ती करण्यात आली असून गोहत्या प्रकरणातील शिक्षा आणखी कठोर करण्यात आली आहे. नव्या कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नव्या कायद्यानुसार गोहत्येतील दोषींना जन्मठेपेसह एक लाख रुपयांचा दंड भरवा लागेल तसंच गोमांसची वाहतूक करणार्‍यांना 7 ते 10 वर्षांच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे.

गोहत्याबंदी सुधारित विधेयकाबाबत मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी गेल्याच आठवड्यात संकेत दिले होते. गायींच्या रक्षणासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करेल, असं ते म्हणाले होते. यावर्षी नोव्हेंबरमध्ये गुजरात विधानसभेची निवडणूक होणार आहे. यामुळे या घडामोडींकडे भाजपची ही निवडणुकीची तयारी असल्याच्या दृष्टीने बघितलं जातंय. गेल्या वर्षी गुजरातच्या उनामध्ये गोहत्येच्या संशयावरून काही दलितांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला होता. देशात अनेक ठिकाणी याविरोधात निदर्शनंही करण्यात आली होती.