गोहत्येवर बंदी हवीच, पण गोवंश हत्येवर नको

0

मुंबई। केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी गोहत्या बंदीचे समर्थन केले आहे. गोहत्या बंदी करायलाच हवी, पण गोवंश आणि इतर जनावरांच्या हत्येवर बंदी नको, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी ते बोलत होते. गोवंश हत्याबंदी केल्यास शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतील, अशी भीतीही आठवले यांनी व्यक्त केली.

शेतकरी आणि गरिबांच्या अडचणी दूर करण्यासाठी गोहत्या बंदीतून बैल, म्हैस आदी गोवंश वगळले पाहिजे, असेही रामदास आठवले यांनी सूचवले. गोरक्षणाच्या नावाखाली काही कथित गोरक्षकांच्या गटांकडून दलितांवरील हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. रामदास आठवले यांनी अशा कथित गोरक्षकांवर निशाणा साधला. लोकांनी अशा प्रकारे कायदा हातात घेणे योग्य नाही, असेही आठवले म्हणाले. गायींची तस्करी होत असल्याचे लक्षात आल्यास त्याची माहिती पोलीस प्रशासनाला त्वरित द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

गोरक्षणासाठी सरकारने अधिक प्रमाणात सहभाग वाढवण्याची गरज असून, याबाबत आठवले यांनी शेतकर्‍यांवरील ओझे कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे, असे सांगितले. शेतकरी गोवंशाच्या पालनपोषणासाठी पैसे उभारू शकला नाही तर सरकारने जबाबदारी घेऊन यासंबंधी काही तरतूदी कराव्यात. जेणेकरून शेतकर्‍यांवर पडणारा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल, असेही आठवले यांनी सुचवले.

गाय हिंदू धर्माच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. देशातील काही राज्यांमध्ये गोहत्या बंदी कायदा आधीपासूनच लागू आहे. मात्र, काही राज्यांमध्ये हा कायदा लागू केलेला नाही. त्यामुळे त्या-त्या राज्य सरकारांनी गोहत्याबंदी कायदा करून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे, असेही आठवले म्हणाले.