जिल्ह्यात 297 वाहनांवर कारवाई
जळगाव – जिल्ह्यात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारी सुमारे 297 वाहने पकडण्यात आली आहेत. त्यांच्याकडून 2 कोटी 48 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. 28 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे यांनी दिली. जिल्ह्यात सर्वच ठिकाणचे वाळूचे ठेके बंद करण्यात आले आहेत. वाळू चोरांवर वचक बसण्यासाठी रात्रंदिवस महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांची पथके नेमण्यात आली आहेत.
जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने सर्वच नद्यांना पाणी आहे. यामुळे वाळू गटांचे लिलाव करण्यासाठी वाळू गट स्पष्ट असे दिसत नाहीत. नद्यांचे पाणी कमी झाले की वाळू गट निश्चित केले जातील. नंतर त्याचे लिलाव केले जातील. 30 सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्वच वाळू गटांची मुदत संपल्याने तेव्हापासून वाळू उपशास बंदी आहे. बांभोरी येथे 324 ब्रासचा वाळूचा साठा आढळून आल्यानंतर त्यांचा लिलाव करण्यात आला होता. हा ठेका एकाच व्यक्तीने घेतल्याने त्याला उपशास वेळ मिळावा यासाठी काही दिवसांची मुदत वाढ देण्यात आली होती. या वाळू ठेक्याच्या उत्खननात अनियमितता आढळून आल्याने जळगाव तहसीलदारांच्या पत्रावरून हा ठेका रद्द करण्याचे तात्काळ आदेश दिल्याने आता सर्वत्र वाळू वाहतूक बंद करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अवैधरीत्या वाळूचा उपसा, वाहतूक होताना दिसेल तेथे महसूल विभागाचे अधिकारी कारवाई करीत आहे.