गौण खनिजाची चोरी करणारी 7 वाहने पकडली

0

धुळे। जिल्ह्यात चोरी छुपे गौण खनिज वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला असून धुळे ग्रामीणच्या अप्पर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पथकाने काल धडाकेबाज कारवाई करीत रावेर, नकाणे आणि कुंडाणे परिसरातून गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणारी सात वाहने पकडल्याने गौण खनिज चोरांचे धाबे दणाणले आहे. अप्पर तहसीलदार ज्योती देवरे, नायब तहसीलदार मिलिंद वाघ, सर्कल नेमाणे, तलाठी सामुद्रे, काकडे, फुलपगारे यांच्या पथकाने गुरुवारी कारवाई केली.

तीन लाख रूपयांचा दंड
रावेर, कुंडाणे व नकाणे परिसरातून गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक करण्यात येत होती. त्यात रावेर, कुंडाणे रस्त्यावरून दोन डंपर पकडण्यात आले. सदर डंपर विटाभट्टी कामासाठी जात असल्याचे सांगण्यात आले. परंतु त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा परवाना किंवा पास नव्हती. तसेच नकाणे परिसरात अवैधरित्या वाळूचे उत्खनन करुन वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर, अन्य तीन वाहने अशी एकूण 7 वाहने पकडण्यात आली. दोन वाहनचालकांनी सुसाट वेगाने वाहने चालवून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र तहसिलदारांच्या पथकाने त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न हाणून पाडला आणि पाठलाग करुन त्यांना त्वरीत पकडले. सदर कारवाईत डंपर नं. एमएच 18/एए-3831, एमएच 18/एए-8390, एमएच 18/झेड-0592, एमएच 18/डी-513, एमएच 18/एएन-1183, एमएच 18/एएन-9240 आणि एमएच 18/457 क्रमांकाचा मुरूम भरलेला ट्रॅक्टर अशी एकूण सात वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. दुपारी उशिरापर्यंत वाहनधारकांवर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. अवैधरित्या गौणखनिजाची वाहतूक करणार्‍यांना तीन लाख रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

वाहतूक करणार्‍यांना तंबी
या कारवाईत जी वाहने पकडण्यात आली, त्या वाहनांच्या चालकांना आणि मालकांना अप्पर तहसीलदार ज्योती देवरे यांनी सज्जड दम भरला असून, भविष्यात पुन्हा गौण खनिजाची चोरटी वाहतूक करताना ही वाहने आढळून आल्यास सर्व वाहने कायमस्वरुपी सरकार जमा करुन त्यांची लिलावाद्वारे विक्री केली जाईल, असा इशारा गौण खनिजचोरांना दिला आहे.