किन्हीसह गोंभी परीसरात नियम धाब्यावर ; महसूल प्रशासनाच्या संशयास्पद भूमिकेने आश्चर्य ; जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांची जिल्हा खनिकर्म अधिकार्यांकडे लेखी तक्रार
भुसावळ- तालुक्यातील किन्हीसह गोंभी परीसरात अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन सुरू असून महसूल प्रशासनाने केलेली डोळेझाक संशयास्पद असल्याची तक्रार जिल्हा परीषदेचे सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी जिल्हा खनिकर्म अधिकार्यांकडे केली आहे. अवैधरीत्या गिट्टीसह मुरूमाची व रेतीची वाहतूक होत असताना स्थानिक महसूल प्रशासन दखल घेत नसल्याने गौण खनिज माफियांचे फावले असून याबाबत दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गावानजीकच होते अवैध उत्खनन
जि.प.सदस्य पाटील यांच्या तक्रारीनुसार किन्ही गावाच्या 100 ते 150 मीटर अंतरावर गौण खनिजाची उत्खनन सुरू आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून दिवसा व रात्री सुरू असलेल्या या प्रकाराला ग्रामस्थ वैतागले आहेत. हे काम गावाच्या अगदी जवळ असल्यामुळे ग्रामस्थ व शेतकर्यांना फार मोठा त्रास सोसावा लागत आहे. शेतकर्यांच्या पीकांचे मोठे नुकसान यातून होत असून या ठिकाणी 30 ते 40 फुटांचे ड्रील करून एकाच वेळी 8 ते 10 ड्रील करून ब्लास्टींग केले जात असल्याने गावातील घरांना भूकंपाच्या स्वरुपात धक्के बसत आहे. या सर्व बाबीची पाहणी जि.प.सदस्य रवींद्र नाना पाटील, उपसरपंच प्रदीप कोळी, ग्रामसेवक विजय काक्रवाल यांनी नुकतीच केली.
प्रशासनाचे हेतुपुरस्कर दुर्लक्ष
दिवसाढवळ्या पर्यावरणाचे नुकसान होत असताना कारवाईची जवाबदारी असलेले स्थानिक तहसीलदार, महसूल प्रशासन या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. वयोवृद्ध नागरीकांसह मुला-मुलींचे आयुष्य यामुळे धोक्यात आले आहे शिवाय शेतीतील पिकांवरही संकट कोसळले आहे. स्थानिक शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला असून जिल्हा प्रशासनानेच आता दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
नियमानुसार उत्खनन -तहसीलदार
तहसीलदार भाऊसाहेब थोरात म्हणाले की, जिल्हाधिकार्यांनी याबाबत सर्व नियमानुसार गोंभीसह किन्ही येथील उत्खननाला परवानगी दिल्या आहेत शिवाय ब्लास्टींगचा परवाना दिला आहे. आपल्याकडे सदस्यांनी तक्रार केलेली नाही शिवाय खनिकर्म अधिकार्यांकडे तक्रार केली असल्यास त्यांच्याकडून कारवाई होईल, असे तहसीलदार भाऊसाहेब थोरात म्हणाले.