गौण खनिज अपहार प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त

0

जळगाव: जिल्हा परिषदेच्या मालकीचे जिल्हा जलसंधारण विभागामार्फत झालेल्या पांझरा तलाव, साठवण बंधारे तसेच विविध जलसिंचन प्रकल्पाच्या कामातून मोठ्या प्रमाणात गौण खनिजे तसेच वाळूची वाहतूक करण्यात आलेली आहे. मात्र यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे. कोट्यवधीचा रॉयल्टी घोटाळा झाल्याचे आरोप करत देयकासोबतच्या तपशिलात आणि पावत्यांमध्ये तफावत आढळून आल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी केली होती. सोमवारी २८ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. दरम्यान त्यांच्या मागणीवरून गौण खनिज रॉयल्टी प्रकरणी चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांच्या आदेशानुसार समिती नियुक्त करण्या ताली असून १५ दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

ही आहे समिती
सर्वसाधारण सभेत या प्रकरणाची मुळापासून चौकशी करण्याचे आश्वासन सीईओ यांनी दिले होते, त्यानुसार २८ रोजी चौकशी समिती नेमण्याचे आदेश पारित करण्यात आले. चार सदस्यीय समितीचे प्रमुख जि.प.कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीत जि.प.सहायक कार्यकारी अभियंता सतिष शिसोदे, जि.प.सहायक लेखा अधिकारी निलेश पाटील, जि.प.सहायक लेखा अधिकारी अनिल भदाणे हे तीन सदस्य आहेत. समितीला संपूर्ण प्रकरणाची मुळापासून चौकशी करून पुढील १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. चौकशीला विलंब होऊ नये अशी सूचना करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
जिल्हा परिषदेच्या मालकीच्या पांझर तलाव, साठवण बंधारे तसेच विविध सिंचन प्रकल्पाच्या कामातून मुरूम वाहतूक करण्यात आली आहे. मात्र रॉयल्टीची रीतसर नोंद करण्यात आलेली नसून यातून मोठा अपहार करण्यात आल्याचे आरोप करण्यात होते. तसेच वाळू उपसा करतांना चक्क दुचाकी, तीनचाकीच्या परवान्यांचा वापर केला गेला गेल्याची धक्कादायक प्रकार माहिती अधिकारातून उघड झाल्याचे सौ. सावकारे यांनी सांगितले होते. याप्रकरणी सौ. सावकारे यांनी सोमवारी २८ रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पत्र देऊन चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.