गौण खनिज माफीयांवर 17 कोटी रुपयांचा बोजा

0

शिक्रापूर । शिरुर तालुक्यात जून 2017 ते मार्च 2018 या काळात तहसील रणजीत भोसले यांनी तब्बल 125 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यात 118 वाहन मालकांकडून 95 लाख 11 हजार 560 दंड वसूल केला आहे, तर उर्वरित 7 वाहनमालकांसह गौण खनिज उत्खननात 31 प्रकरणांमध्ये 16 कोटी 80 लाख 93 हजार 485 इतक्या रकमेचा सहा महिन्यांत बोजा चढविण्याची राज्यातील पहिलीच कारवाई केली आहे. दरम्यान, या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

जप्त केलेली वाहणे पळवून नेण्याचे प्रकार
शिरुर तालुक्यात तहसीलदार रणजीत भोसले यांनी वाळू माफीयांवर मोठी जरब बसवली असून एका वर्षात 1 कोटीच्या जवळपास 118 वाहनांकडून दंड वसूल केला असून 16 कोटींपेक्षा अधिक रकमेचा गौण खनीज माफीयांच्या सातबारा उतार्‍यावर बोजा चढवण्याचे आदेश देवूनही तालुक्यात वाळू माफीया राजरोसपणे वाळुची अनधिकृत वाहतूक करीत आहेत. तर महसूल विभागाने पकडलेली वाळुची वाहने पळवून नेण्याचे प्रकार घडत असल्याने या वाळू माफीयांवर तालुक्यातील कोणाचा वरदहस्त आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

स्थानिक तरूण हाताशी धरूण चोरी
राज्यात मुरुम, माती, वाळू माफीयांनी मोठा धुमाकूळ घातला आहे. माती चोरीमुळे जमिनी नामशेष होतील की अशी काही ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाळू उत्खननासाठी शासन जाहीर लिलाव करते मात्र, लिलावाची रक्कम व त्यानंतर महसूल विभागासह स्थानिकांचे अर्थकारण यामुळे वाळू माफीयांनी लिलावातून अंग काढुन घेतले आहे. लिलाव न झालेल्या ठिकाणातून महसूल अधिकार्‍यांना व गावातील स्थानिक तरुणांना हाताशी धरुन कमी खर्चात वाळू काढण्याचा नवा मार्ग वाळू माफीयांनी शोधल्यामुळे शासनाचा महसूल मोठा बुडत आहे.

माफीयांवर कारवाई तीव्र
दरम्यान, शिरुर तालुक्यात तहसीलदार रणजित भोसले यांनी वाळू माफियांवर आपली जरब कायम ठेवत मंगळवारी पुन्हा अनधिकृत वाळू वाहतूक करणार्‍या सहा वाहनांवर कारवाई केली असल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. सकाळी तहसीलदार रणजीत भोसले यांनी मंडल अधिकारी व तलाठी यांच्या पथकासह अनधिकृत वाळू वाहतूक करणार्‍या सहा वाहनांवर तहसील शिरूर मधील मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या पथकाने काल कारवाई केली आहे. यातील चार वाहने तळेगाव ढमढेरे धान्य गोदाम येथे तर दोन वाहने तहसील कार्यालय शिरूर येथे लावण्यात आली आहेत. या कारवाईत मंडल अधिकारी गोसावी, घोडके, देशमुख, तलाठी बराटे, नरवडे हे सहभागी होते.

कारवाईत पकडण्यात आलेल्या वाहनांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून त्यानंतर त्यांच्या मालकांना दंडाची आदेश बजावण्यात येणार आहेत. नेमून दिलेल्या मुदतीत दंडाची रक्कम न भरल्यास वाहन मालकांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात येणार आहे. तहसील कार्यालयाकडून अनधिकृत गौण खनिज वाहतुकीस आळा घालण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारर्‍यांची पथके तयार करण्यात आली असून या पथकांकडून या पुढेही अशीच कारवाई करणयात येणार आहे.
-रणजित भोसले, तहसीलदार, शिरूर