गौतमचा संघमालकांवर गंभीर आरोप

0

नवी दिल्ली । केकेआर सोडल्यानंतर गंभीरने दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र दिल्लीने आयपीएलच्या 11 व्या सत्रातील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली नाही. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दिल्ली सातत्याने पराभूत होत होती. त्यामुळे गौतम गंभीरने आपले कर्णधारपद सोडले होते. मात्र कर्णधारपद सोडल्यानंतर गौतमला एकाही सामन्यात संधी दिली गेली नाही. गंभीरने एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात चेन्नईच्या विजयाचे आणि दिल्लीच्या पराभवाचे खरे कारण सांगितले आहे.

गौतमने दिल्ली संघाच्या पराभवाचे आणि चेन्नईच्या यशाचे कारण लेखात लिहिले आहे. गौतमच्या मते चेन्नईने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली. कारण, संघाचे महत्त्वाचे निर्णय हे संघमालक घेत नसून प्रत्येक निर्णय केवळ कर्णधार धोनीच घेत होता. परंतु आयपीएलमध्ये इतर संघांबरोबर असे घडत नाही. बाकी संघाच्या बाबतीत संघाच्या निर्णयांमध्ये मालकांचा हस्तक्षेप जास्त असल्याचे गौतम गंभीरने म्हटले आहे आणि याचाच फटका सघांला बसल्याचे त्याने लिहिले आहे. आपल्या या लेखातून गौतम गंभीरने संघमालकांवर जोरदार प्रहार केला आहे. फ्रँचायझी क्रिकेटच्या विश्‍वात भरपूर काही चालत असते. हा एक महागडा व्यवसाय आहे, जेथे फ्रँचायझी फी, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचा पगार, प्रवास असे अनेक खर्च असतात. अजून एक अशी गोष्ट आहे. जी कोणत्याही ताळेबंदात दिसत नाही ती म्हणजे अहंकार. बहुतेक संघमालक हे आयपीएलच्या बाहेर आपल्या क्षेत्रातील यशस्वी लोक असतात. क्रिकेटपटूंप्रमाणे त्यानांही पराभूत होणे पसंद नसते. जिथे क्रिकेटपटू पराभूत झाल्यावर आपली हार खेळ भावनेने मान्य करतात. मात्र, संघ मालक हे त्यावेगळे वागतात. ते फक्त आपण केलेल्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल याच विचारात असल्याचे गौतमने लिहिले आहे.