श्रीनगर : काश्मीरच्या रेसी जिल्ह्यात गौरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात पाच नागरिकांसह एक 9 वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. एक बंजारा परिवार आपल्या पाळीव जनावरांसह तवाडा येथे जात असताना गौरक्षकांच्या एका टोळक्याने त्यांना आडवून त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडितांनी सांगितले की, हल्लेखोर त्यांच्याकडील मेंढ्या, बकर्या व गायी घेऊन निघून गेले. या सर्व जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर पोलिस प्रमुख एस. पी. वैद यांनी सांगितले की, हल्लेखोरांविरूध्द एफआयआर दाखल करण्यात आला असून पाच हल्लेखोरांची ओळख पटली आहे. परंतु अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. जखमींमध्ये 9 वर्षांची सम्मी नावाची मुलगी असून तिच्या शरिरात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. उधमपुर विभागाच्या डीआयजींशी चर्चा केली असून या गुंडांवर योग्य ती कारवाई तातडीने करण्यात येईल, असे वैद म्हणाले.
पीडित परिवाराने सांगितले की, हा भयंकर हल्ला आम्ही कधीही विसरू शकणार नाही. पीडित नसीम बेगमने सांगितले, त्यांनी आम्हाला अतिशय निर्दयीपणे मारहाण केली. आमचा एक दहा वर्षांचा मुलगा बेपत्ता आहे. तो जीवंत आहे की मृत, हे देखील आम्हाला माहित नाही. त्यांनी आमच्या परिवारातील ज्येष्ठांनाही मारहाण केली. ते गुंड आम्हाला ठार मारून नदीत आमचे मृतदेह टाकण्याच्या तयारीत होते. सुदैवाने आम्ही वाचलो.
मेंढ्या आणि बकर्यांशिवाय या परिवाराकडे 16 गायी होत्या. बेगम यांनी सांगितले की, त्या लोकांनी आमच्या कुत्र्यांनाही सोडले नाही. त्यांनाही ते घेऊन गेले. काश्मीरात अनेक बंजारा परिवार आहेत. दरवर्षी ते त्यांच्या तांड्यासह जम्मूच्या हिमालय पर्वताच्या परिसरातून काश्मीरच्या मैदानी क्षेत्रापर्यंत प्रवास करतात.