गौराईच्या आगमनासाठी बाजारापेठ सजली

0

पुणे । गणरायाच्या आगमनानंतर मंगळवारी घरोघरी गौराईचे आगमन होणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू असून मुखवटे, साड्या, दागिने, हार, पडदे अशा प्रकारची तयारी करण्यात महिलावर्ग व्यग्र आहे. त्यासाठी गौराईचे विविध मुखवटे आणि सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या असून या साहित्याच्या खरेदीसाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे. मुखवटे खरेदीसोबतच मंगळसूत्र, चपलाहार, मोत्याच्या माळा, जोडवी, बांगड्या, नथ अशा पारंपरिक दागिन्यांसह विविध साड्याही खरेदी केल्या जात आहेत.

महिनाभरापासून मुखवटे विक्रीसाठी आले आहे. काही वर्षांपासून रंगीबेरंगी मुखवट्यांचे आकर्षण वाढले आहे. पूर्वी सुकड्यांचे मुखवटे तयार केले जात होते. त्यावर रंगकाम करून चेहरा तयार करण्यात येत होता. तर काहींकडे खापराचे-पितळाचे मुखवटे तर काहींकडे धातूंचे, तसेच मातीच्या उभ्या अथवा पाटावर गौराई मांडलेल्या असतात. अनेकांकडे वंश परंपरेने गौरीची स्थापना केली जाते. घरात नवीन सून आली की ते कुटुंब गौराईसाठी लागणारे साहित्य पुन्हा नव्याने खरेदी करते.