‘गौरी गणपतीच्या सणाला…’च्या गीतकारावर उपासमारीची वेळ

0

पुणे । ‘टिंब..टिंब.. टिंबाली.. , गौरी गणपतीच्या सणाला… , माझ्या गणानं घुंगरू हरवलं…’ या गाण्याचे सूर पुढील दहा दिवस प्रत्येकाच्या ओठावर असतील. ही गाणी सर्वांना ज्ञातही असतील, परंतु या गाण्याला ज्यांनी सूर दिले त्या उत्तमराव कांबळे यांचा सर्वांनाच विसर पडला आहे. साठीचा उंबरठा पार केलेल्या गीतकारावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.

शहरातील भवानी पेठ परिसरातील झोपडपट्टीत छोट्याश्या पत्र्याच्या घरात राहणार्‍या या कलावंतावर सध्या अत्यंत हलाखीचे दिवस आले आहेत. ते सध्या राहत असलेले घरसुद्धा त्यांच्या सासूबाईंचे आहे. उत्तम कांबळे यांनी आपल्या आयुष्यात अनेक गाणी लिहिली आहेत. आता त्यांनी आपल्या वयाची साठ वर्षे पूर्ण केली आहेत. आयुष्यभर त्यांनी स्वत:ला लोककलेसाठी झोकून दिले आहे. परिस्थितीअभावी त्यांना शिक्षण देखील पूर्ण करता आले नाही.

या वयातही अथक प्रयत्न करून ते आपल्या संसाराचा गाडा ओढत आहेत. वय झाले असले तरी पत्नी दुसर्‍याच्या घरी घरकाम करत आहे, तर मुलगा दुसर्‍याच्या वाहनांवर ड्रायव्हर म्हणून काम करत आहे. कांबळे यांना वयोमानामुळे काहीच काम करता येत नसून ते सध्या घरीच आपली कला जोपासण्याचे काम करत आहेत.

कुटुंबासाठी काहीच करता आले नाही
कांबळे म्हणाले, मी आतापर्यंत अनेक लोकगीते, आरत्या, भक्तिगीते, देशभक्तीपर गाणी, गवळणी, भावगीते, समाजसुधारकांवरील गाणी रचली आहेत. मात्र, शिक्षणाचा अभाव आणि परिस्थितीमुळे वारंवार माझी बड्या लोकांकडून फसवणूक झाली. शिक्षणाचे मूल्य मला समजते. मात्र, परिस्थितीमुळे मला माझ्या मुलालाही इच्छा असून देखील शिकविता आले नाही. ही माझ्या मनात खंत कायम राहील. मला माझ्या आयुष्यात माझ्या कुटुंबासाठी देखील काहीच करता आले नाही. याचेच दुख: होत आहे. आता उतारवय गाठले आहे. परंतु, माझ्या सारखा अंत कोणा लोककलाकाराचा होऊ नये असे वाटते. उत्तम कांबळे यांची जीवन कहाणी ऐकली की ज्या गणेशोत्सावासाठी महापालिका कोट्यवधींचा खर्च करून विश्‍वविक्रम करण्याचा हव्यास करत आहे. त्यांनी जागतिक व्हावे; पण कांबळेंसारख्या लोककलावंताकडेही लक्ष द्यावे!

‘माझ्या गणानं घुंगरु हरवलं’
कांबळे यांनी गणेशोत्सवावर अनेक गाणी रचली आहेत. यामध्ये ‘माझ्या गणानं घुंगरू हरवलं.., गौरीला घावलं! बंधू येईल माहेरा न्यायला…, गौरी गणपतीच्या सणाला!’ याशिवाय प्रत्येक सणात डीजेवर वाजणारे लोकप्रिय गीत ‘बघ..बघ..अग सखे कस गुबू…गुबू वाजतंय, माठाला गेला तडा…,’ ही गवळण व अन्य अनेक गाणी रचली असल्याचे त्यांनी सांगितले.