पुणे-कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळेचा सीबीआयला अखेर ताबा मिळाला असून पुणे न्यायालयाने अमोल काळेला १४ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपींना अमोल काळेने मदत केल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केला.
गौरी लंकेश हत्येतील प्रमुख आरोपी अमोल काळे हाही डॉ. दाभोलकर यांच्या हत्याकटात सामील असल्याची माहिती उजेडात आली होती. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर संशयित मारेकरी कळसकर आणि अंदुरे यांनी ज्या दुचाकीवरून पळ काढला तिची व्यवस्था काळेने केली होती, अशी माहिती उघड झाली होती. अमोल काळेचा ताबा मिळावा, यासाठी सीबीआयने प्रयत्न सुरु केले होते. अखेर अमोल काळेला सीबीआयने ताब्यात घेतले आणि त्याला गुरुवारी दुपारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने एका बंद डायरीच्या माध्यमातून पुणे न्यायालयासमोर युक्तिवाद सादर केला. तपासात अडथळे निर्माण होत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला न्यायालयात तोंडी युक्तिवाद करु नये, असे आदेश दिले होते. त्यानुसार सीबीआयने एका बंद डायरीच्या माध्यमातून न्यायाधीश एस. ए. सय्यद यांच्या समोर युक्तिवाद सादर केला.
सीबीआयचे वकील विनयकुमार ढाकणे म्हणाले की, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येतील आरोपींना अमोल काळे यांनी मदत केली आहे. षडयंत्र रचणे आणि शस्त्र पुरवण्याच काम अमोल काळेने केले. त्यामुळे अमोल काळेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.