बंगळुरू – ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देऊ नये अशी मागणी गौरी लंकेश यांच्या कन्या कविता लंकेश यांनी केली आहे. कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात प्रगती केली आहे. याप्रकरणी १६ जणांना अटक करण्यात आली आहे. दोन आरोपपत्रे दाखल झाली आहेत. इतका तपास पुढे गेला असताना या टप्प्यावर प्रकरण सीबीआयकडे देण्यात काहीच अर्थ नाही,’ असे कविता लंकेश यांनी म्हटले आहे. ‘जर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शविली तर आपण स्वत: या प्रकरणात पक्षकार होऊ आणि या निर्णयास सुप्रीम कोर्टात विरोध करू,’ असा इशारा कविता लंकेश यांनी दिला आहे.
गौरी लंकेश, एम.एम. कलबर्गी, गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत एकसूत्रता दिसत असल्याने हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे देण्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. मात्र आता कविता लंकेश यांनी याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवू नये अशी मागणी केली आहे.
गौरी लंकेश ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या. ५ सप्टेंबर रोजी गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.