गौरी लंकेश हत्येचा ‘सनातन’वर संशय!

0

बेंगळुरू : कर्नाटकातील डाव्या विचारसरणीच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी तेथील पोलिसांनी सनातन संस्थेवरच संशय व्यक्त केला आहे. इकॉनॉमिक टाईम्स या इंग्रजी दैनिकाने याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांकडून कॉम्रेड गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळ्यांचा बॅलेस्टीक अहवाल मागवला आहे. गौरी यांची हत्या पानसरे दाभोलकरांप्रमाणेच झाल्याचे कर्नाटक पोलिसांना वाटत आहे, त्यामुळे हा अहवाल मागवण्यात आला.

माहितीचा तपशील गोपनीय
कर्नाटकमधील पोलिस अधिकारी या प्रकरणातील तपासाबाबत माहिती मात्र मीडियापासून दूर ठेवत आहेत. सरकारकडून या प्रकरणातील तपासाचा तपशील गोपनीय ठेवावा असे आदेश देण्यात आले आहेत. तेथील गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांना सनातन संस्थेवर असलेल्या संशयाबाबत विचारले असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले पोलिस शक्य त्या सगळ्या अंगांनी या हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने हाताळले जात असल्याचे सांगत तपासाबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला.

सनातनची लवकरच पत्रकार परिषद
गौरी लंकेश यांच्या हत्येत सनातनच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याच्या बिनबुडाच्या बातम्या काही माध्यमांना हाताशी धरुन प्रसारित केल्या जात आहेत. यातून तपासाची दिशा जाणीवपूर्वक भरकटवण्याचा प्रकार काही सनातन विरोधक आणि हिंदूद्वेष्टे यांच्याकडून केला जात आहे. या विषयी सनातन संस्थेची भूमिका लवकरच पत्रकार परिषदेद्वारे माध्यमांसमोर मांडली जाईल, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी सांगितले.