ग्नेल जिमखान्यात 226 गुणांनी महिला, पुरुषांनी जनरल चॅम्पियनशिप पटकावला

0

नवी मुंबई । सर्व प्रकारच्या खेळांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रोत्साहित करण्यात येत असून खेळांना पोषक वातावरणनिर्मितीसाठी पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे, असे सांगत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी विविध खेळांचे प्रशिक्षण देऊन गुणवंत खेळाडू घडवण्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सीबीडी बेलापूर, सेक्टर 3 मध्ये भारतरत्न स्व. राजीव गांधी क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महापौर चषक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या बक्षीस समारंभाप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करत होते.

याप्रसंगी महापौर महोदयांसमवेत उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती मंदाकिनी म्हात्रे, सभागृह नेता रवींद्र इथापे, परिवहन समिती सभापती प्रदीप गवस, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती विशाल डोळस, विधी समिती सभापती गणेश म्हात्रे, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव अशोक अहेर, सहसचिव राजेंद्र मयेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. दोन हजारहून अधिक स्पर्धकांचा सहभाग लाभलेल्या या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत ग्नेल जिमखाना यांनी विविध अ‍ॅथलेटिक्स क्रीडा प्रकारात एकूण 226 गुणांची कमाई करत नवी मुंबई महापौर जनरल चॅम्पियनशिप चषक पटकावला. 119 गुण मिळवत ग्नेल जिमखाना यांनी पुरुष चॅम्पियनशिप तसेच महिला चॅम्पियनशिप 107 गुण मिळवत ग्नेल जिमखाना महिला समूहाने संपादन केली. दोन दिवस चाललेल्या या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत दोन हजारपेक्षा जास्त क्रीडापटूंचा उत्स्फूर्त सहभाग लाभला याबद्दल समाधान व्यक्त् करत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती विशाल डोळस यांनी खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका कटिबद्ध असल्याचे सांगितले.

यापुढील काळात महानगरपालिका आयोजित करीत असलेल्या स्पर्धा उपक्रमात सहभागासाठी या नव्यानेच विकसित केलेल्या क्रीडा विभागाच्या नवीन संकेतस्थळावर ऑनलाइन नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये 50, 100, 200, 400, 800 मीटर धावणे, लांबउडी, गोळाफेक, 100 द 4 रिले अशा विविध क्रीडा प्रकारात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये शिकत असलेले 6, 8, 10, 12, 14 व 16 वर्षाआतील वयोगटात (मुले व मुली स्वतंत्र गट) तसेच ठाणे जिल्ह्यातील खुल्या गटातील 2 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते.