पुणे । ग्रंथप्रर्दशनाच्या माध्यमातून विविध प्रकाशकांची आणि वेगवेगळ्या साहित्य प्रकाराची दुर्मिळ पुस्तके व ग्रंथ एका छताखाली वाचकप्रेमींसाठी उपलब्ध होत असतात. पुण्यात ही प्रदर्शने मोठ्या प्रमाणात भरवली जात होती. परंतु ऑनलाईन खरेदी, ई-बुकमुळे वाचकांनी याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आयोजकांचे मोठे नुकसान होत आहे. प्रर्दशन भरविण्यासाठी लागणारा खर्चही भरून निघत नसल्याने आयोजकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
ई-बुककडे लोकांचा कल
सध्या ऑनलाईन विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. तसेच विविध साईट वर पुस्तकांच्या खरेदीवर आकर्षक सूट देण्यात आली आहे. त्यामुळे ई-बुक वाचनाकडे लोकांचा कल वाढला आहे. घरबसल्या ऑनलाइन खरेदीचा मार्ग वाचकांनी स्वीकारला आहे. त्याची झळ पुस्तकाच्या दुकानांसह ग्रंथप्रदर्शनात विक्री करणार्या विक्रेत्यांना बसत आहे.
खर्च मोठा उत्पन्न कमी
पुस्तके मांडण्यासाठी वापरण्यात येणार्या टेबल-खुर्च्यांचे दररोजचे भाडे, फ्लेक्स, बॅनर या माध्यमांसह वृत्तपत्रांतील जाहिरात, प्रदर्शनासाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्यांचे पगार यावर मोठा खर्च होतो. इतका खर्च केल्यानंतर पुस्तकांची विक्री होईल, हे ही निश्चित नसते. ग्रंथप्रदर्शनासाठीचा खर्च सध्या वाढत आहे. या व्यवसायातून उत्पन्नही तुटपुंजे मिळत आहे.
विक्रीची शाश्वती नाही
वाढते खर्च आणि तुटपुंजे उत्पन्न याचा ताळमेळ जुळत नसल्याने आम्ही दिवाळीनंतर ग्रंथप्रदर्शन भरविलेलेच नाही. प्रदर्शन भरविण्यासाठी लागणारा खर्चही भरून निघत नाही. पुस्तकांची विक्री होईल याची कोणतीही शाश्वती उरलेली नाही.
– रमेश राठिवडेकर, अक्षरधारा बुक गॅलरी