सुनिल जोशी : दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन
राजगुरुनगर । ग्रंथालये ही मराठी भाषा संवर्धन व वाचन संस्कृतीची केंद्रे आहेत, असे मत खेडचे तहसिलदार सुनिल जोशी यांनी व्यक्त केले. राजगुरुनगर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने 1832 ते 1900 सालापर्यंत प्रकाशीत झालेल्या काही दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखीतांचे प्रदर्शन येथील वाचनकक्षात भरविले होते. त्याचे उद्घाटन तहसिलदार जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गानू, राजेंद्र सुतार, सदाशिव आमराळे, पवन कासवा आदी उपस्थित होते.
संस्कारक्षम पिढीचा विचार जोपासतोय
राज्यातील विविध ग्रंथालयात असणार्या समृध्द ग्रंथपरंपरेतून मराठी भाषेचे संक्रमण आणि त्यातून संस्कारक्षम पिढी हा विचार जोपासला जातोय, असे सांगून जोशी यांनी राजगुरुनगर सार्वजनिक वाचनालयाने जपणूक केलेल्या दुर्मिळ हस्तलिखीत व ग्रंथसंपदा उपक्रमाचे कौतूक केले. शहरातील अनेक वाचनप्रेमी नागरीकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन प्राचिन ग्रंथसंपदा पहावयास मिळाल्याचा अभिप्राय नोंदविला असल्याचे राजेंद्र सुतार यांनी सांगितले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल सुप्रिया तपस्वी, राजेंद्र राशिनकर, कल्पना वाव्हळ आदींनी प्रयत्न केले.