उस्मानाबाद: उस्मानाबादमध्ये होत असलेल्या ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला आज शुक्रवारपासून सुरुवात झाले आहे. संमेलनाची सुरूवात ग्रंथ दिंडीने करण्यात आली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा अरूणा ढेरे, विक्रम काळे आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ढाले-पाटील यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचं पूजन करण्यात आले. ग्रंथ दिंडीला साहित्य प्रेमींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. दरम्यान आता संमेलानाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो यांच्या प्रकृतीतही सुधारणा झाल्याची माहिती समोर आली आहे. संध्याकाळी पार पडणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थित राहणार असून अध्यक्षीय भाषणही करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आजपासून तीन दिवस हे संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाला देशभरातील मराठी साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.
ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर हे संमेलनाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांना संमेलनाला उपस्थित न राहण्यासाठी धमकीचा फोन आला होता. परंतु आपण कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं महानोर यांनी सांगितलं. दरम्यान, धमकीनंतर फादर दिब्रिटो आणि महानोर यांच्या सुरक्षेतही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.