ग्रहणासंबंधित चुकीच्या समजुतीमुळे गर्भवती महिलांची कुंचबणा

0

मुंबई | भारतात सोमवारी, ७ ऑगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क केले जात असल्याने “गर्भवती” महिलांना हे ग्रहण त्रासदायक वाटू लागले आहे. शास्त्र आणि परंपरा अशा नावांखाली ग्रहणाचा बागुलबुवा केला जात आहे. या परिस्थितीवर भाष्य करताना मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ञ गंधाली देवरुखकर यांनी, गर्भवती महिलेला ग्रहण संपेपर्यंत काहीच खाऊ पिऊ न देणे म्हणजे शुध्द थोतांड असल्याचे ‘जनशक्ति’ला सांगितले.

चंद्र आणि सूर्य यांच्या प्रवासातील एक टप्पा म्हणजे ग्रहण. आकाशमंडलात चंद्र आणि सूर्य यांच्या प्रवासात ते परस्परांच्या समोर आले तर ग्रहण असते. यात काही शकून आणि अपशकून असण्याचे कारणच नाही. मात्र चुकीच्या समजुतीमुळे आपल्याकडे घरात गर्भवती असताना जर एखादे ग्रहण आले तर जणू काही नैसर्गिक आपत्तीच कोसळली आहे, असे त्या महिलेला भासविण्यात येते. याविषयी डॉ. गंधाली देवरुखकर सांगतात, आपल्या उदरात बाळ वाढविणाऱ्या आईविषयी अवघ्या घराला काळजी असते. बाळाला काही होऊ नये या प्रेमळ भावनेपोटी तिला शांत बसायला सांगणे इष्ट आहे. परंतु गर्भवतीस ग्रहण संपेपर्यंत उपाशी ठेवणे चुकीचे आहे.

गर्भाच्या रक्तातली साखर खालावते
ग्रहणादरम्यान पृथ्वीवरील वातावरणात काही प्रमाणात फरक पडतो. पण त्याचा अर्थ काही खाऊ पिऊ नये, असा होत नाही. विशेषतः गर्भवती महिलाना या अनावश्यक बंधनामुळे त्रासाला सामोरे जावे लागते. गर्भवती महिलांना भूक मुळीच सहनच होत नाही. गर्भाला तर त्याहून नाहीच नाही, जर संपूर्ण दिवस उपवास केला तर रक्तातली साखर उतरते. चक्कर येते, थकवा येतो. गर्भाच्या रक्तातली साखर ही थेट आईच्या शुगरलेव्हलवर अवलंबून असते. अनेक कुटुंबात ग्रहणाच्या दिवशी तर गर्भवती महिलांना एका बंद खोलीत डांबून ठेवतात. अशामुळे या महिला मानसिक तणावाखाली येऊ शकतात.

मलमूत्र विसर्जन टाळणे हीही अंधश्रद्धा
ग्रहणकाळात मलमूत्र विसर्जन करू नये, हीही एक मोठी अंधश्रद्धा आहे. यामुळे गर्भवती महिलांना जंतूसंसर्ग होऊ शकतो. ग्रहणात जन्मलेले बाळ व्यंग घेऊन जन्मते, हा लोकांचा गैरसमज आहे. वास्तविक बाळाचा जन्म आणि ग्रहण याचा शास्त्रीय काहीही संबंध येत नाही. एखाद्या बाळाला शारीरिक व्यंग असेल तर त्याला ग्रहणाचे लेबल लावून त्याचे तुफान मार्केटिंग केले जाते. ग्रहण हे पृथ्वीवरील संकट मानले जाते. वास्तविक आई वडिलांच्या जनुकीयांचाच परिणाम या बाळांच्या शरीररचनेत होत असतो. ग्रहणामुळे शारीरिक व्यंग झाल्याचे वैद्यकीय क्षेत्रात सिद्ध झालेले नाही, असे डॉ. गंधाली देवरुखकर यांनी स्पष्ट केले.