ग्रामगीता स्पर्धेत शिरपुरच्या पौर्णिमा महाजन यांना यश

0

शिरपूर । नागपूर जिल्ह्यातील राळेगांव येथील विश्‍व महामानव विचार प्रतिष्ठानतर्फे आयोजीत सार्थ ग्रामगीता स्पर्धेत शिरपूर तालुक्यातील उंटावद येथील पौर्णिमा दत्तात्रय महाजन हीने तीसरा क्रमांक मिळविला असून त्या पुरस्काराचे वितरण नुकतेच नागपूर येथील सिताबर्डी भागातील विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात करण्यात आले. या पुरस्कारामुळे गावासह समाजाचे नाव रोशन तर झाले आहेच तिची ही वाटचाल यशाच्या शिखरावर पोहोचविणारी ठरणार आहे. राळेगाव येथील विश्‍व महामानव विचार प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज सार्थ ग्राम गीता स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेत 2 हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यात उंटावद येथील पौर्णिमा दत्तात्रय महाजन हिने देखील सहभाग घेतला. यातील स्पर्धेसाठी 250 जण पात्र ठरल्यानंतर त्यांच्यात झालेल्या स्पर्धेत पौर्णिमा महाजन हिने तिसरा क्रमांक मिळविला.

यशाबद्दल अनेकांनी केले कौतुक
या पुरस्काराचे वितरण नुकतेच नागपूर येथील सिताबर्डी भागातील विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी गुरूकुंज मोंझरी येथील श्री गुरूदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक हरीभाऊ वेरूळकर, दाभा येथील आंतरभारती आश्रमाचे आचार्य डॉ.भाऊ झिटे, औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श ग्राम पाटोदाचे जनक भास्करराव पेरे पाटील, सप्त खंजरीवादक लोकप्रबोधनकार सत्यपाल महाराज, भाऊसाहेब थुटे, राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाचे संस्थापक प्रवर्तक ज्ञानेश्‍वर रक्षक, प्रा.संजय नाथे आदिंची उपस्थिती होती.

25 हजारांचा धनादेश
यावेळी पौर्णिमा महाजन हिला स्मृतीचिन्ह व 25 हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला. अल्पशिक्षित अशा उंटावद येथील दत्तात्रय महाजन व शालिनी महाजन यांची ती मुलगी असून घरातील बेताची परिस्थिती असतांना देखील आई वडिलांनी मुलींवर योग्य असे संस्कार टाकल्यामुळेच आज त्यांची पौर्णिमा ही मुलगी यशाच्या शिखराकडे वाटचाल करीत आहे. पुरस्कार घेण्यासाठी नागपूर येथे ती आई शालिनी महाजन व अजंदे येथील ईश्‍वर तुकाराम महाजन यांच्यासोबत गेली होती. तिच्या या यशाबद्दल समाजातील अनेकांनी तिचे कौतुक करून अभिनंदन केले.