जळगाव– जिल्ह्यातील 1153 ग्रामपंचायतींचा पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सन 2020-21 या वर्षाचा ग्रामपंचायत विकास आराखडा ़़सुधारीत करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत. हा आराखडा 31 मे पर्यंत तयार करण्याचे आदेश पंचायत समितीच्या बीडिओंमार्फत ग्रामपंचायतींना दिले आहेत.
ग्रामपंचायतींनी 2020-21 ते 2024-25 या कालावधीचा पंचवार्षिक आणि सन 2020-21 या वर्षाचा वार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करुन त्यास ग्रामसभेची मंजुरी घेऊन शासनाच्या वेबसाईटवर अपलोडही केले होते. आराखडे तयार करताना केंद्रीय वित्त आयोगाचा निधी किती मिळणार या माहिती उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी गतवर्षी वित्त आयोगाचा मिळालेला निधी विचारात घेऊन हा आराखडा तयार केला होता. मात्र, ग्रामविकास विभागाने सुधारित ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करुन ते प्लन प्लस या वेबसाईटवर अपलोड करण्याच्या सूचना दिल्या. 15 व्या वित्त आयोगाच्या 50 टक्के निधीतून स्वच्छता व हागणदारीमुक्त गावांचा दर्जा राखण्यासाठी व पाणी पुरवठा, पावसाचे पाणी संकलन आणि पुनर्वापरासाठी तसेच उर्वरित 50 टक्के निधीतून ग्रामपंचायत विकास आराखड्यातील इतर उपक्रमासाठी वापरावयाचा आहे.
कामावरील तरतूद किंवा कामाची संख्या कमी-अधिक करणे आवश्यक आहे. सुधारीत केलेल्या विकास आराखड्यात गामपंचायतींच्या मासिक सभेत मान्यता घ्यावी लागणार आहे. ग्रामपंचायत बैठकांचे आयोजन हे ग्रामपंचायत क्षेत्रातील लॉकडाऊन स्थितीत झाल्यानंतर करण्यात यावे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सर्व ग्रामपंचायतींचे सुधारित आराखडे 31 मे पर्यंत प्लॅन प्लस प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी संबंधित पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, तालुका व्यवस्थापक, केंद्र संचालकांना सूचना देऊन मुदतीत कार्यवाही करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी बी.ए.बोटे यांनी दिले आहेत.
Prev Post